डीसीपी पाटील यांनी एसीबीची सूत्रे स्वीकारली
By Admin | Published: June 14, 2017 01:27 AM2017-06-14T01:27:15+5:302017-06-14T01:27:15+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे उपायुक्त म्हणून पी. आर. पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे उपायुक्त म्हणून पी. आर. पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. आतापर्यंत या पदावर असलेले संजय दराडे यांची येथून बदली झाली आहे. त्यांच्याकडून सोमवारी पाटील यांनी सूत्रे घेतली. त्यानंतर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी मंगळवारी चर्चा केली.
मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असलेले पाटील यांनी विज्ञान शाखेत स्नातक पदवी घेतली. एमबीए केल्यानंतर ते तहसीलदार म्हणून रुजू झाले. १९९९-२००० मध्ये त्यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून बदली झाली.
प्रशिक्षणानंतर ते डीवायएसपी अचलपूर (जि. अमरावती) म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी याच पदावर जळगाव, खेड (पुणे), पंढरपूर (सोलापूर), निफाड (नाशिक) येथे जबाबदारी सांभाळली. २०११ ला पदोन्नतीवर ते डीसीपी सोलापूर (क्राईम) म्हणून रुजू झाले. तेथील कार्यकाळ आटोपल्यानंतर त्यांची बदली पुण्याला सीआयडीचे अधीक्षक म्हणून झाली. तेथून पुण्यातच डीसीपी क्राईम म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. महिनाभरापूर्वी त्यांची नागपूर येथे एसीबीचे अधीक्षक म्हणून बदली झाली.
भ्रष्टाचाराची उधळी
संपवण्याचे प्रयत्न करू
भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली उधळी आहे. ही उधळी नष्ट करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू, अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलताना नोंदवली.