आघाडीच्या चर्चेला ‘डेड लॉक’
By admin | Published: January 25, 2017 09:00 PM2017-01-25T21:00:29+5:302017-01-25T21:00:29+5:30
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याच्या चर्चेला ‘डेड लॉक’ लागला आहे. दोन्ही बाजुंच्या नेत्यांच्या मानापमानामुळे घोडे असले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.25 - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याच्या चर्चेला ‘डेड लॉक’ लागला आहे. दोन्ही बाजुंच्या नेत्यांच्या मानापमानामुळे घोडे असले आहे. आता चर्चेसाठी कुणी पुढाकार घ्यायचा असा प्रश्न दोन्ही बाजुंच्या नेत्यांना पडला असून यामुळे इच्छुक उमेदवारांचे मात्र ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे.
आघाडीसाठी राष्ट्रवादीने पहिले पाऊल पुढे टाकले होते. आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृृत्वात एका शिष्टमंडळाने काँग्रेसचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या घरी जाऊन आघाडीची बोलणी केली होती. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाडी करणे आवश्यक आहे हे देखील पटवून दिले होते. मात्र, त्यानंतरही काँग्रेसकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. उलट काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत आघाडी करू नका, असा ठराव संमत करण्यात आला. यामुळे राष्ट्रवादी दुखावल्या गेली. पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत आता आम्ही काँग्रेसकडे स्वत:हून चर्चेसाठी जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आघाडीची चर्चाच थांबली.
आघाडी न झाल्यास लढाईत राष्ट्रवादीचे उमेदवार टिकाव धरतील का, असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेत सर्वट जागांवर उमेदवार उभे केले तर ते काँग्रेसला परवडणारे नाही. याचा फटका नक्कीच काँग्रेसला बसेल. प्रत्यक्षात ज्या उमेदवारांना निवडणूक लढायची आहे त्यांना आघाडी व्हावी असे वाटते. आघाडी झाली तर एकदिलाने लढण्याचे बळ मिळेल, समविचारी पक्षाचा उमेदवार समोर नसल्यामुळे प्रचारात मदत होईल, असे मत इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यांकडे मांडत आहेत. त्यामुळे आता नेत्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र, मानापमानाच्या नाट्यामुळे कुणीही पुढाकार घेण्यास तयार नाही.
काँग्रेसच्या यादीवर उद्या मुंबईत चर्चा
- मनपा विडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी निवडणूक असलेल्या सर्व महापालिकेतील शहर अध्यक्षांना आज, गुरुवारी चर्चेसाठी मुंबईला बोलाविले आहे. यानंतर शुक्रवारी प्रदेश संसदीय मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेस उमेदवारांच्या यादीवर चर्चा होणार आहे. काँग्रेसची गाडी एकाकी समोर सरकत असल्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी होण्याची शक्यता मावळत चालली आहे.