‘त्या’ मृताची ओळख पटली

By admin | Published: July 1, 2016 03:02 AM2016-07-01T03:02:43+5:302016-07-01T03:02:43+5:30

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळी (पेंढरी) शिवारात नऊ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृताची ओळख पटविण्यात हिंगणा पोलिसांना यश आले.

The 'dead' was identified | ‘त्या’ मृताची ओळख पटली

‘त्या’ मृताची ओळख पटली

Next

खुनाचा गुन्हा दाखल : दोन आरोपींना अटक
हिंगणा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळी (पेंढरी) शिवारात नऊ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृताची ओळख पटविण्यात हिंगणा पोलिसांना यश आले. त्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने दोघांना अटक करण्यात आली.
रमेश जगन्नाथ शाहू (४८, रा. बारंगा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव असून, मनोज रामनारायण यादव (२८, रा. वानाडोंगरी, ता. हिंगणा) व नागेंद्र देवनारायण यादव (२७, रा. बालाजीनगर, हिंगणा रोड, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश हा इलेटक्ट्रॉनिक झोन चौकातील हॉटेलमध्ये नोकर म्हणून काम करायचा. दरम्यान, ६ आॅगस्ट २०१५ रोजी देवळी (पेंढरी) शिवारातील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असल्याने तसेच चेहरा विद्रुप करण्यात आल्याने मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना खटाटोप करावा लागला. त्यातच पोलिसांनी मृताच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन तपासले. तो बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या. त्यातच या काळात एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीतील वर्णनाच्या आधारे मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
परिणामी, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागेंद्रला ताब्यात घेत चौकशी केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, तो आणि त्याचा चुलत भाऊ मनोज ५ आॅगस्ट २०१५ रोजी हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. क्षुल्लक कारणावरून या दोघांचे रमेशसोबत भांडण झाले. त्यामुळे दोघांनी रमेशला बेदम मारहाण केली. त्यात रमेशचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी रमेशचा मृतदेह कारमध्ये टाकून पेंढरी (देवळी) शिवारातील नाल्यात फेकला व पुरावे नष्ट केले. या दोन्ही आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास ठाणेदार हेमंत खराबे व सुनील भांडेगावकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The 'dead' was identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.