नागपुरात पोळ्याचा पाडवा ठरला रक्तरंजित; काकाला आश्रय देणाऱ्या भावाची चुलतभावाकडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 02:50 PM2022-08-29T14:50:18+5:302022-08-29T14:55:45+5:30
पाच ठिकाणी प्राणघातक हल्ले, संबंधित भागांत तणावाचे वातावरण
नागपूर : जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात असतानादेखील पोळ्याचा पाडवा उपराजधानीसाठी रक्तरंजित ठरला. चोवीस तासांत शहरात एक हत्या व चार प्राणघातक हल्ल्यांची नोंद झाली. नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत एका तरुणाने आपल्याच चुलत भावाची हत्या केली. या प्रकारामुळे संबंधित भागांत तणावाचे वातावरण होते.
नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत शास्त्रीनगर येथील निवासी शुभम पांडुरंग शेंडे (२७) याची त्याचा चुलत भाऊ हिमांशू पुरुषोत्तम शेंडे (२२) व आशिष अमृत महल्ले (२२, नवी शुक्रवारी) यांनी हत्या केली. हिमांशू हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. दारू पिऊन तो गोंधळ घालतो. तो वडील पुरुषोत्तम शेंडे यांनाही त्रास देत होता. यामुळे हताश होऊन पुरूषोत्तम दीड वर्षापूर्वी मृतक शुभम शेंडे याच्याकडे राहायला गेले होते. शुभम आणि त्याचा भाऊ भूषण यांचे शास्त्रीनगरमध्ये सलून चालवायचे व पुरुषोत्तम यांना ते वडिलांप्रमाणेच मानायचे. त्याचे हे वागणे हिमांशूला खटकत होते.
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता आशिषसोबत दुचाकीवरून तो शुभमच्या घरी पोहोचला व वाद घालण्यास सुरुवात केली. शुभमने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी चाकूने शुभमचा गळा चिरला व दोघेही फरार झाले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. भूषण व त्याच्या कुटुंबीयांनी शुभमला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.
काकानेच १० महिन्यांच्या मुलाला पोरके केले
शुभमला १० महिन्यांचा मुलगा आहे. त्याच्या हत्येने त्याची पत्नी आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. हिमांशूने शुभमला अनेकदा धमक्या दिल्या होत्या. मात्र, त्यांना कुणीच गंभीरतेने घेतले नाही. हिमांशूच्या या कृत्यामुळे शुभमचा मुलगा पोरका झाला आहे.
कट लागल्याने दोघांवर प्राणघातक हल्ला
कळमना येथील डिप्टी सिग्नल येथे कट लागल्याच्या मुद्द्यावरून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री राजेंद्र अर्जुन साहू (१९) हा त्याचा मित्र अमर विलास खोब्रागडे (१९, रा. चिखली वस्ती) व साहिल यांच्यासोबत ट्रिपल सीट दुचाकीवरून जात होता. चिखली ले-आऊटजवळून पन्ना नावाचा तरुण त्याच्या साथीदारासोबत दुचाकीने जात होता. कट मारण्यावरून त्यांच्यात वाद झाला. १५ मिनिटांनी राजेंद्र आणि त्याचे मित्र नाष्टा करत असताना घृणेश्वर उर्फ डोमन ठाकूर (२२) गोपाल नगर हा दोन साथीदारांसह तेथे पोहोचला. 'माझा भाऊ पन्नाला मारणारा कोण आहे,' अशी विचारणा करत त्याने अमर खोब्रागडेला बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. राजेंद्रने मध्यस्थी केली असता आरोपीने त्याच्यावर शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.
जुन्या वादातून प्राणघातक हल्ला
दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून तरुणाचा गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. २७ वर्षीय मोनू उर्फ सय्यद मुख्तार अली (रा. गाडीखाना, गणेशपेठ) हा शुक्रवारी रात्री मित्रासोबत घराजवळ बसला होता. त्याचवेळी आरोपी राजेश उर्फ राजू तायडे (४८ रा. ओम साई नगर, दिघोरी) हा दुचाकीवरून आला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादावरून त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राजेशने मोनूवर चाकूने हल्ला करून जखमी केले. मोनूजवळ बसलेला त्याचा मित्र वसीम खान (३८) याने मदतीसाठी धाव घेतली. राजेशने वसीमच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात वसीम रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने मेयो इस्पितळात नेण्यात आले. मोनूच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
शिवीगाळ करण्यावरून टोकल्याने हल्ला
शिवीगाळ करण्याच्या मुद्द्यावरून टोकल्याने जरीपटक्यात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. न्यू ठवरे कॉलनी, जरीपटका येथे राहणारे अमोल सुरेश पाटील हे शनिवारी दुपारी पत्नीसह घरासमोर बसले होते. त्याचवेळी ऋतिक विजय वाघमारे (१८) व कुणाल कृष्णा वाघमारे (३०, रिपब्लिकन नगर) हे दोघे वाद घालून एकमेकांना शिवीगाळ करत होते. अमोलने दोघांनाही शिवीगाळ करू नका, असा सल्ला दिला. यावरून संतापलेल्या आरोपींनी अमोलच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी केले. जरीपटका पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
रामबागमध्ये दुचाकी फोडल्या, घरावर दगडफेक
शुक्रवारी रात्री इमामवाड्यातील रामबागवस्तीमध्ये गुन्हेगारांनी दुचाकी फोडल्या. रात्री दोन वाजता आरोपींना सांकेतिक बडग्या काढला. त्याला वस्तीत फिरवत असताना त्यांनी दुचाकीची मोडतोड केली. काही घरांवर दगडफेकही करण्यात आली. पोलिसांना पाहताच गुन्हेगार पळून गेले. नंतर काही तरुणांना पकडण्यात आले.
लघुशंकेच्या वादातून चाकूने वार
मोकळ्या जागेत लघुशंका करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादात चार आरोपींनी एका तरुणावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अभिलाष मुन्ना नागदिवे (२९, साईबाबा नगर) हा मित्राच्या घरी जेवण करायला गेला होता. तेथून परत जात असताना सर्वश्रीनगर येथे एका किराणा दुकानाजवळ लघुशंकेला थांबला. त्यावेळी तेथे बसलेले छोटू बाळापुरे (२५), बाबू साखरे (२८), प्रवीण शिंदे (३२), निशेष शिंगळे (३५) यांनी त्याच्याशी वाद घातला व त्याला ढकलले. काही वेळाने अभिलाष मानव भांडारकर व वैभव कावळे (२१, खरबी) या त्याच्या मित्रांना घेऊन आरोपींना जाब विचारायला गेला. त्यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी अभिलाष व त्याच्या मित्रांना मारहाण केली व बाळापुरेने वैभव कावळेच्या छातीवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. अभिलाषच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.