नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 08:36 PM2019-10-31T20:36:12+5:302019-10-31T22:30:51+5:30

जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले.

Deadly attack by dogs on child in Nagpur | नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला 

नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला 

Next
ठळक मुद्देदूरवर ओढत नेले, जीव बचावला : पालकांमध्ये पसरली दहशत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरात कुत्र्यांचा हैदोस प्रचंड वाढला असून दररोज वाहनचालकांना रस्त्यावर कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचा सामना करावा लागतो. जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील अशी धक्कादायक घटना घडली. या भागात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले. लोकांचे लक्ष गेले नसते तर दुर्दैवी घटना घडली असती. चिमुकल्याचा जीव बचावला पण या घटनेने पालकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 


भांगे ले-आऊट, जयताळा येथील शैलेश कोरडे यांचा ७ वर्षीय मुलगा सिद्धेश शेजारच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेला होता. दुकानातून परत येताना अचानक एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. अचानक कुत्रा अंगावर आल्याने प्रचंड घाबरलेला सिद्धेश पळायला लागला. यावेळी तेथे असलेल्या इतर चार कुत्रे सिद्धेशच्या अंगावर धावले. शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतला. एवढ्यावरच न थांबता त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्याच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी असलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला. हातात काठी घेउन नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावले व सिद्धेशला त्याच्या घरी सोडले. वडील शैलेश कोरडे यांनी तात्काळ खासगी रुग्णालयात व नंतर मेयो रुग्णालयात उपचार सुरू केला. सिद्धेशचा जीव थोडक्यात बचावला, मात्र पालकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे आणि संतापही व्यक्त करण्यात येत आहे. लोक धावले नसते तर आज एक दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीच्या सुट्या असल्याने मुले त्यांच्या परिसरात गल्ल्यांमध्ये खेळत असतात. अशावेळी या कुत्र्यांनी पालकांची चिंता वाढविली आहे. मनपा प्रशासनाने मोकाट श्वानांना पकडावे किंवा त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खरतर शहरात गल्लोगल्लीत फिरणारे श्वान ही मोठी समस्या झाली आहे. रात्री अपरात्री रस्त्यावरून जाणाºया वाहनचालकांवर हे कुत्रे एकत्रितपणे हल्ला करतात. या भीतीमुळे अनेकदा तोल जाउन धोका होतो. दररोज अशाप्रकारे दुर्घटना समोर येत आहेत. काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे आजाराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांकडून दररोज होते. सिद्धेश कोरडे या चिमुकल्याच्या घटनेमुळे प्रशासन ही समस्या गंभीरतेने घेईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Deadly attack by dogs on child in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.