विरोधकांच्या मुद्यावर सत्ताधारी होतात बहिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:31+5:302021-01-23T04:08:31+5:30
अध्यक्ष हेतू पुरस्सर विरोधकांना बोलूच देत नसल्याचा आरोप : विशेष सभेत विरोधकांचा पुन्हा सभात्याग नागपूर : जिल्हा परिषदेच्या विशेष ...
अध्यक्ष हेतू पुरस्सर विरोधकांना बोलूच देत नसल्याचा आरोप : विशेष सभेत विरोधकांचा पुन्हा सभात्याग
नागपूर : जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत विरोधकांची बोलती बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न सत्ताधारी करतात. विरोधकांच्या मुद्यावर सत्ताधारी बहिरेपणाचे सोंग करतात. अध्यक्ष हेतू पुरस्सर विरोधकांना बोलूच देत नाहीत. सत्ताधारी सदस्यांच्या असंबंधित विषयाला प्रोत्साहन दिले जाते. असा आरोप सलग दुसऱ्यांदा झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत विरोधकांनी करीत सभात्याग केला. विरोधकांनी विषयसूची सभागृहात भिरकावत, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर ऑफलाइन झालेली ही दुसरी विशेष सभा आहे. कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेची सभा वनामतीमध्ये झाली होती. तेव्हाही विरोधकांना सभागृहात विषय न मांडू देता सत्ताधाऱ्यांनी सभा संपुष्टात आणली होती. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अटॅकिंग पोझिशनवर ठेवले. ८० लाखांच्या औषधी खरेदीचा मुद्दा विरोधकांनी उचलल्यावर, सत्ताधाऱ्यांनी आक्रमकतेने विरोधकांच्या मुद्याला बगल दिली. पालकमंत्री पांधन रस्त्याच्या विषयावर माजी पालकमंत्र्यांवरच ताशेरे ओढत विरोधकांना चूप बसविले. सभागृहात विरोधी पक्ष नेते विरुद्ध काँग्रेसचे प्रकाश खापरे, अवंतिका लेकुरवाळे, दुधाराम सव्वालाखे असा संघर्ष सातत्याने बघायला मिळाला. भाजपचे सदस्य राधा अग्रवाल, राजेंद्र हरडे, आतिश उमरे आम्हाला बोलू तर द्या, यासाठी त्यांना गळा फाडून ओरडावे लागले. या दरम्यान विषय मांडत असताना, पुन्हा ताणाताणी सुरू झाली. विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधी सदस्यांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली का, प्रत्येक मुद्यावर तेच का, उभे होतात, यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्रमकतेने दबाव वाढविला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, असा सूर काढत विरोधी पक्षनेत्याने सभागृहात विषय सूची भिरकावली. अशात सभागृहातील ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे यांनी मध्यस्थी करीत सभागृह शांत केले. त्यामुळे काही सदस्य व पं.स. सदस्यांंना आपल्या भागातील एक-दोन विषय मांडताही आले.
अशात पुन्हा अवंतिका लेकुरवाले यांनी दोन विषय मांडताना लांबलचक प्रास्ताविक केले. यावर विरोधक पुन्हा आक्रमक झाले, आमचे विषय एका शब्दात आणि सत्ताधारी सदस्यांचे असंयुक्तिक विषय भाषणासारखे मांडू दिले जात असल्याने विरोधक संतापले. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी षडयंत्र आखल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.
- सभागृहात किती अध्यक्ष?
विरोधकांनी कुठलाही विषय मांडला की तीन सत्ताधारी सदस्य अध्यक्षांची भूमिका बजावतात. व्यासपीठावरील अध्यक्षांना बोलू न देता, स्वत:च रुलिंग देऊन विषय संपवितात. व्यासपीठावरील अध्यक्ष लोकशाहीचा भंग होत असतानाही, गप्प बसून विरोधकांचाच आवाज दाबतात. सभागृहात अशी वागणूक मिळत असेल्याने याची तक्रार आम्ही विभागीय आयुक्तांकडे करणार असल्याचा विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी सांगितले.
- भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीशी सत्ताधारी
जिल्हा परिषदेच्या ८ महिन्यांच्या कार्यकाळात दोन सदस्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक झाली. यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत असल्याने अधिकाऱ्यांवर वचक बसावा, अशी भूमिका विरोधकांची होती. यावर सत्ताधाऱ्यांनी तुमच्या काळात अधिकारी लाच घेताना पकडले नाही का? अशी भूमिका मांडत प्रशासनातील भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. वास्तविक या विषयावर सभागृहातील सर्वच पक्षाच्या गटनेत्यांची भूमिका आक्रमक असायला हवी होती. प्रशासनाला धारेवर धरता आले असते; पण यावर काँग्रेसने मवाळ वक्तव्य केले, ना राष्ट्रवादी बोंबलली, ना शिवसेनेने भूमिका मांडली.
- सभागृहात माजी ऊर्जामंत्री असतात टार्गेटवर
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत टाकण्याचा विषय उचलला, की अवंतिका लेकुरवाळे, नाना कंभाले, प्रकाश खापरे हे माजी ऊर्जामंत्र्यांना टार्गेट करून विरोधकांची कोंडी करतात. सलग दोन्ही सभेत माजी ऊर्जामंत्र्यांच्या कार्यकाळातील काही विशेष विषयांना टार्गेट करून विरोधकांना गुदमरून सोडतात.
- विरोधकांजवळ सभागृहात विषय मांडण्यासाठी विषयच नसल्यामुळे त्यांना सभात्याग करावा लागतो.
-मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प.