करदात्यांसोबत निष्पक्ष व्यवहार करा : आशा अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:21 AM2019-06-02T00:21:44+5:302019-06-02T00:22:48+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात करदात्यांमध्ये स्वच्छेने कर भरणा करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जनसंवादासाठी अधिकारी विभागाचा चेहरा आहे. सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी करदात्यांसोबत निष्पक्ष व्यवहार करावा, असे आवाहन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात करदात्यांमध्ये स्वच्छेने कर भरणा करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जनसंवादासाठी अधिकारी विभागाचा चेहरा आहे. सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी करदात्यांसोबत निष्पक्ष व्यवहार करावा, असे आवाहन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना येथे केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या देशातील १६९ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. उत्तरायण-२०१९ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. विभागाच्या विविध क्षेत्रांमध्ये नियुक्त होण्यापूर्वी अधिकाऱ्यांना आठ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आशा अग्रवाल म्हणाल्या, अधिकाऱ्यांच्या व्यवहारामुळे जनसामान्यांच्या मनात विभागाची प्रतिमा अंकित होते. निष्पक्षता, तत्परता आणि पारदर्शक यासारख्या गुणांमुळे विभागाची प्रतिमा उत्कृष्टतेकडे नेता येते. त्याकरिता अधिकाऱ्यांमध्ये व्यवहार कौशल्य महत्त्वाचे आहे.
प्रशिक्षणात कर संग्रहणाच्या मुख्य मुद्यासह करचोरीच्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासह काळ्या पैशाचा स्रोत, फसवणूक आणि विभिन्न वित्तीय घोटाळे आणि आर्थिक गुन्ह्याचा निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच डिजिटल फॉरेन्सिक, डेटा अॅनालिसिस, आधुनिक लेखा सॉफ्टवेअर आदींवर माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना शारीरिक फिटनेसवर भर देण्यात येणार आहे. निवासी प्रशिक्षणात एक आठवड्याच्या अभ्यासीय भारत दर्शनादरम्यान देशातील विविध सामाजिक आणि व्यापारिक क्षेत्राशी संपर्क साधून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जगातीत सर्वाेत्तम कर प्रणाली आणि एक आठवड्याच्या आंतरराष्ट्रीय कर प्रणाली प्रशिक्षणाचा समावेश आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या कौशल्यात वाढ होणार आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान राहणार आहे. यावेळी एनएडीटीचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.