नागरिकांशी सौजन्याने वागा : पोलीस आयुक्त-सहआयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:58 PM2020-03-25T22:58:23+5:302020-03-25T22:59:38+5:30
‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले. तसेच नागपूर पोलिसांची प्रतिमा लक्षात ठेवून व्यवहार करा, उपद्रव करणाऱ्यांशी कडक वागा परंतु विनाकारण बळाचा वापर करू नका, नागरिकांशी सौजन्याने वागा,असे निर्देशही दिले.
विनाकारण लोक रस्त्यावर येत असल्याने पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या लोकांवर दंडुके चालवले. परंतु यात अनेक निरपराध लोकही बळी पडले. नागरिकांनी आपली नाराजीही व्यक्त केली. कुठलीही विचारणा न करता पोलीस दंडुके चालवित असल्याबद्दल आपला रोष व्यक्त केला. पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्तांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. आज बुधवारी गुन्हे मिटिंग दरम्यान पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त यांनी ठाणेदारांशी संवाद साधला. तेव्हा आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचे कुणी पालन करीत नसेल, उपद्रव करीत असेल तर त्याच्याशी कठोरपणे वागा परंतु सर्वसामान्य नागरिकांशी सभ्यतेनेच वागले पाहिजे. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी घरासमोर फिरत असलेल्या लोकांशी विनाकारण अभद्र व्यवहार करण्यात आला. असे होता कामा नये. सामान्य नागरिक घराबाहेर फिरताना दिसून आले तर त्यांना समजावून घरी पाठवा. कामाचा ताण आणि उपद्रव करणाऱ्या लोकांप्रति असलेला राग सामान्य नागरिकांवर काढणे योग्य नाही. नागपूर पोलिसांनी आपल्या कार्यातून नागरिकांमध्ये चांगली ‘इमेज’ तयार केली आहे. त्यामुळे नागरिक नेहमीच पोलिसांचे समर्थन करीत त्यांना साथ देतात. ही ओळख कायम ठेवणे पोलिसांची जबाबदारी आहे.
सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी टेलिफोन एक्सचेंज चौकात विनाकारण फोटो काढण्यासाठी उठाबश्या करायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. वाठोडा आणि सीताबर्डीच्या ठाणेदारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलही फटकारले. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना आवश्यकता असलेल्या लोकांना पास उपलब्ध करण्यास टाळाटाळ न करण्याचे निर्देश दिले.
ते म्हणाले, किराणा, धान्य, दूध, भाजीपाला आदी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांशिवाय गरजू व्यक्तींना पास द्यायला हवे. पास जारी करण्यात काही ठाणेदार नागरिकांना योग्य प्रतिसाद देत नाही आहेत. याच्या तक्रारीही पोलीस आयुक्तांकडे आल्या आहेत. आयुक्तांनी अशा ठाणेदारांना तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीत मनपाच्या एनडीएस पथकाबाबतही नागरिकांमध्ये रोष असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. लॉकडाऊन असूनही २३ मार्च रोजी सतरंजीपुरा झोनमध्ये एनडीएस पथक जागनाथ बुधवारी येथे अतिक्रमण कारवाई करीत होते. नागरिकांनी या पथकाचा घेराव करून अपमानित केले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सूचना न देता कारवाई करण्यात आली होती. एनडीएस पथक पोलिसांसारखी वर्दी घालत असल्याने पोलिसांनी प्रतिमा मलिन होत असल्याचेही सांगण्यात आले.