नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘अजय’ बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 09:20 PM2018-04-07T21:20:32+5:302018-04-07T21:20:51+5:30
महाराजबागेत जन्मलेला, वाढलेला व गेल्या १९ वर्षांपासून प्राणिसंग्रहालयाचा साथी असलेल्या ‘अजय’ नामक बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला. नुकताच येथील जाई नामक वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराजबागेतील कर्मचारी व वन्यजीवप्रेमींसाठी हा आठवडाभरातील दुसरा धक्का होय. वयामुळे यकृत निकामी झाल्याने अजयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराजबागेत जन्मलेला, वाढलेला व गेल्या १९ वर्षांपासून प्राणिसंग्रहालयाचा साथी असलेल्या ‘अजय’ नामक बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला. नुकताच येथील जाई नामक वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराजबागेतील कर्मचारी व वन्यजीवप्रेमींसाठी हा आठवडाभरातील दुसरा धक्का होय. वयामुळे यकृत निकामी झाल्याने अजयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराजबागेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हा चार वर्षांपासून कानामध्ये इन्फेक्शन झाल्याने अस्वस्थ होता. उपचाराने बरा व्हायचा, मात्र हा त्रास त्याला वारंवार उदभवत होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अधिक खालावली होती. रक्त तपासणी केल्यानंतर कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याची बाब लक्षात आली. त्यानुसार सलाईनद्वारे कॅल्शियम पुरविण्यात आले, मात्र त्याला मागचा पाय उचलण्यातही त्रास जाणवू लागला. अखेर शनिवारी सकाळी ११.१५ वाजता अजयने शेवटचा श्वास घेतला. दुपारी २ वाजता त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. रूपाली चर्जन, डॉ. अभिजित मोटघरे आदी उपस्थित होते. यामध्ये त्याचे यकृतही निकामी झाल्याची बाब समोर आली. सोबतच वयानुसार किडनी आणि इतर अवयवांमध्येही बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे डॉ. बावस्कर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुपारी ३ वाजता महाराजबाग परिसरात अजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राणिसंग्रहालय नियंत्रक डॉ. पार्लावार, डॉ. पोटदुखे, डॉ. जीवतोडे व प्रा. विजय खवले आदी उपस्थित होते.
अजय हा १९ वर्षांपूर्वी १३ जून १९९९ रोजी महाराजबागेतच जन्मलेला पाहुणा. गोपाल आणि ज्युलीपासून त्याचा जन्म झाला. तेव्हापासून तो इथेच असल्याने महाराजबागेच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लळा होता. अजय प्राणिसंग्रहालयातील सर्वाधिक वयाचा बिबट होता. सध्या महाराजबागेत सात बिबट वास्तव्यास असल्याचे डॉ. बावस्कर यांनी सांगितले. नुकतेच २९ मार्च रोजी येथील जाई नामक वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराजबाग कर्मचारी व वन्यजीवप्रेमींसाठी हा आठ दिवसातील दुसरा धक्का ठरला आहे.