अमन धुर्वे मृत्यूप्रकरण : प्रभारी मुख्याध्यापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:56 PM2018-07-14T23:56:47+5:302018-07-14T23:58:19+5:30
देवलापार जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी अमन चंद्रशेखर धुर्वे याचा शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार धरत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी शुक्रवारी रात्री जारी केले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देवलापार जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी अमन चंद्रशेखर धुर्वे याचा शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार धरत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी शुक्रवारी रात्री जारी केले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
अमन धुर्वे, रा. जुनेवाणी, ता. रामटेक हा शुक्रवारी सकाळी शाळेच्या आवारात मित्रांसोबत खेळत असताना त्याचा भिंतीलगत असलेल्या उघड्या अर्थिंगला अनावधानाने स्पर्श झाला आणि जोरात विजेचा धक्क्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या शाळेतील वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आल्याने प्रभारी मुख्याध्यापक भोयर यांनी शेजारच्या घरून वीजपुरवठा घेतला होता. त्यासाठी त्याने फेजचा एकमेव वापरला असून, अर्थिंग शाळेतच दिले होते. ती अर्थिंगची तार संभाव्य धोका टाळण्यासाठी पीव्हीसी पाईपमध्ये टाकणे अनिवार्य असताना, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात ओलाव्यामुळे त्या अर्थिग तारेत वीजप्रवाह प्रवाहित झाला आणि त्यात अमनचा जीव गेला.
या सर्व बाबी प्रथमदर्शनी चौकशी स्पष्ट झाल्या. या गंभीर प्रकाराला प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी प्रभारी मुख्याध्यापक भोयर यांना जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७, कलम - ३, महाराष्टÑ जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४, कलम - २, ३ व अन्वये दोषी ठरवित त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांना चौकशीच्या अंतिम निर्णयापर्यंत निलंबित केले.
धामणी येथे राहण्याचे आदेश
प्रभारी मुख्याध्यापक नीलकमल भोयर यांना त्यांच्या निलंबनाच्या काळात कुही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धामणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राहण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी दिले. हा काळ अर्धवेतनी रजा असतो. भोयर यांना निलंबनाच्या काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसे केल्यास गैरवर्तणूक मानले जाईल. ही बाब त्यांच्या निर्वाह वेतनावर परिणाम करणारी ठरेल. शिवाय, या काळात त्यांचा निर्वाह भत्ता काढण्याचे आदेश कुही पंचायत समिती प्रशासनाला दिले असल्याचेही शिक्षणाधिकारी वंजारी यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.