अवनीच्या मुलीचा मृत्यू आत्यंतिक धक्क्यामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 12:01 AM2021-03-17T00:01:58+5:302021-03-17T00:03:07+5:30
Avni's cub death गेल्या शनिवारी मृत्यू पावलेल्या अवनीच्या बछडीचे शवविच्छेदन मंगळवारी करण्यात आले. आत्यंतिक धक्क्यामुळे हृदयक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे मत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूने व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या शनिवारी मृत्यू पावलेल्या अवनीच्या बछडीचे शवविच्छेदन मंगळवारी करण्यात आले. आत्यंतिक धक्क्यामुळे हृदयक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे मत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूने व्यक्त केले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील एनक्लोजरमध्ये असलेल्या या पीटीआरएफ-८४ वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले होते. मात्र जंगलात तिची पीटीआरएफ-६२ या वाघिणीसोबत झुंज झाली. यात ती गंभीर जखमी झाली होती. यामुळे तिला उपचारासाठी परत आणणे आवश्यक होते. उपचारासाठी आणण्यासाठी तिला बेशुद्धीकरण करून पकडण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र १३ मार्चला रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.
एनटीसीएच्या नियमावलीनुसार मंगळवारी मृत वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले. कांद्री येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. समर्थ, गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व उपचार केंद्रातील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुजीत कोलांगत, पेंच व्याघ्र प्रकल्पातील डॉ. चेतन पतोंड आणि ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमधील डॉ. सय्यद बिलाल या डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. यावेळी एनटीसीएचे प्रतिनिधी म्हणून डॉ. श्री उपाध्ये, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते उपस्थित होते. शवविच्छेदनादरम्यान मृत वाघिणीच्या शरीरावर बऱ्याच जखमा आढळून आल्या. हा मृत्यू आत्यंतिक धक्क्यामुळे हृदयक्रिया बंद झाल्यामुळे झाल्याचे मत डाक्टरांच्या चमूने दर्शवले. पुढील अभ्यासासाठी आवश्यक ते नमुने गोळा करण्यात आले. त्यानंतर मृत वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.