विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
By admin | Published: October 28, 2016 02:40 AM2016-10-28T02:40:18+5:302016-10-28T02:40:18+5:30
रात्रीच्या वेळी पिकांचे ओलित करण्यासाठी शेतात जात असलेल्या दोन तरुणांना मार्गातील नाला ओलांडताना जोरदार विजेचा धक्का लागला.
गोंडी मोहगाव शिवारातील घटना : नाल्यातील पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित
काटोल : रात्रीच्या वेळी पिकांचे ओलित करण्यासाठी शेतात जात असलेल्या दोन तरुणांना मार्गातील नाला ओलांडताना जोरदार विजेचा धक्का लागला. त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या नाल्यातील पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित होता. ही घटना काटोल तालुक्यातील गोंडी मोहगाव शिवारात बुधवारी रात्री घडली. मृतांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी दोघांचेही मृतदेह काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले होते. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता.
सुमित केशव मारबते (२१) व महेंद्र मनोहर मारबते (२३) दोघेही रा. मोहगाव (भदाडे) ता. नरखेड अशी मृत तरुणांची नावे आहेत. मारबते कुटुंबीयांची काटोल तालुक्यातील गोंडी मोहगाव शिवारात शेती आहे. हल्ली ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असल्याने तसेच दिवसा थ्री फेज वीजपुरवठा बंद केला जात असल्याने दोन्ही तरुण बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेतात जाण्यासाठी घरून पायी निघाले. त्यांचे शेत गावापासून तीन कि.मी. अंतरावर आहे. शेताच्या वाटेवर नाला असल्याने ते नाला ओलांडत होते. नाल्यातील पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित असल्याने दोघांनाही विजेचा जोरदार धक्का लागला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोघेही गुरुवारी सकाळी घरी परत न आल्याने सुमितचे वडील त्यांना बोलावण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी दोघांचेही मृतदेह नाल्यात पडले असल्याचे आढळून आले. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच ग्रामस्थ गोळा झाले. माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाळून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले.
त्यातच अंदाजे ३०० ते ३५० ग्रामस्थ तसेच मृतांचे नातेवाईक काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालयात येऊन आर्थिक मदतीचे आश्वासन द्यावे, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यावर पालकमंत्र्यांनी कुटुंबीयांना मोहगाव (भदाडे) येथे जाण्याची सूचना केल्यानंतरही ग्रामस्थ व नातेवाईकांनी दोन्ही मृतदेह उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले.
त्यावेळी कार्यालयात अधिकारी नव्हते. शिवाय, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे व महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी ग्रामस्थांना दाद दिली नाही. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी रात्री मोहगाव (भदाडे) येथे जावून मृतांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. (तालुका प्रतिनिधी)
नाल्यात टाकला अर्थिंग
नाल्याच्या काठावर नरेंद्र वसंतराव मदनकर यांची शेती आहे. त्यांनी ओलितासाठी या नाल्यावर मोटरपंप बसविला असून, त्यासाठी विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजप्रवाह घेतला होता. या तारांचा अर्थिंग मात्र नाल्यातील पाण्यात टाकण्यात आला होता. त्यामुळे पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत राहणार असल्याची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली होती. परंतु, थ्री फेज वीजपुरवठा दिवसभर बंद व रात्रभर सुरळीत राहत असल्याने शेतकऱ्यांना रात्री ओलितासाठी नाईलाजास्तव जावे लागते. दिवसा थ्री फेज वीजपुरवठा उपलब्ध असता तर ही घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
पालकमंत्र्यांची दिले आश्वासन
मृतांचे कुटुंबीय उपविभागीय कार्यालयात ठाण मांडून बसले होते. त्यातच उपविभागीय अधिकारी (महसूल) अर्चना पाठारे या सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुटुंबीयांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलावण्याची आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे पाठारे यांनी लगेच मृतांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांशी फोनवर बोलणे करवून दिले. पालकमंत्र्यांनी मृख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन्ही मृतदेह सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास कार्यालयातून उचलण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर मोहगाव (भदाडे) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.