नागपुरात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:37 PM2018-12-29T23:37:22+5:302018-12-29T23:38:32+5:30
उघड्यावर राहणाऱ्या दोन व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना आज सकाळी उघडकीस आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उघड्यावर राहणाऱ्या दोन व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना आज सकाळी उघडकीस आल्या.
शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फूटपाथवर एका ५० ते ६० वयोगटातील अनोळखी इसम हा मृत अवस्थेत आढळला. याप्रकरणी रमीश अलीम अब्दुल (वय २८, रा. एलआयसी क्वॉर्टर) यांनी दिलेल्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
त्याचप्रमाणे गुरुवारी रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैद्यनाथ चौकाजवळच्या फूटपाथवर ४० ते ५० वयोगटातील एक व्यक्ती उघड्यावर कुडकुडताना आढळला. त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या दोन्ही मृतांची पोलीस ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.