३५ शेळ्यांसह वासराचा हाेरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:09+5:302021-08-17T04:14:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : रुई (खैरी) (ता. हिंगणा) येथील गाेठ्याला साेमवारी (दि. १६) पहाटे आग लागली. या आगीत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : रुई (खैरी) (ता. हिंगणा) येथील गाेठ्याला साेमवारी (दि. १६) पहाटे आग लागली. या आगीत दाेन शेतकऱ्यांच्या ३५ बकऱ्यांसह एका वासराचा हाेरपळून मृत्यू झाला. यात किमान चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती नुकसानग्रस्तांनी दिली असून, ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुई (खैरी) येथील कृष्णा नत्थूजी सहारे व भूजंग नामदेव समर्थ हे दाेघेही शेळी व गाय पालनाचा व्यवसाय करीत असून, त्यांनी गावापासून २०० मीटर अंतरावर गाेठा बांधला आहे. दाेघांचीही सर्व जनावरे त्या गाेठ्यात नेहमीप्रमाणे बांधलेली हाेती. दरम्यान, पहाटेच्या सुमारास गाेठ्याला आतून आग लागली. पहाटे संपूर्ण गाव झाेपेत असल्याने ही बाब सुरुवातीला कुणाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ही आग पसरत गेली.
या आगीत किमान चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती हिंगणा पाेलीस व महसूल विभागाला देण्यात आली. त्या अनुषंगाने तलाठी राधेश्याम सोनकुसरे यांनी जळालेल्या गाेठ्याचा पंचनामा केला. दाेघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच यात त्यांचे माेठे नुकसान झाल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी रुई (खैरी) येथील शेतकऱ्यांसह अन्य नागरिकांनी केली आहे.
...
मीटरजवळ शाॅर्टसर्किट
या गाेठ्यात विद्युत कनेक्शन आहे. मीटरजवळ शाॅर्टसर्किट झाले आणि ठिणगी पडल्याने आतील जमिनीवर असलेल्या कचऱ्याने पेट घेतला. ही आग सकाळी ६ वाजताच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आली. ताेपर्यंत संपूर्ण गाेठ्याची राख झाली हाेती. शिवाय, आत बांधलेल्या ३५ शेळ्यांसह एका वासराचा आत हाेरपळून मृत्यू झाला, अशी माहिती कृष्णा सहारे व भूजंग समर्थ यांनी संयुक्तरीत्या दिली. ही आग पहाटे ३ वाजताच्या सुमारास लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.