नागपुरात दुसऱ्या माळ्यावरून पडून चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:08 AM2018-12-27T00:08:50+5:302018-12-27T00:09:54+5:30
दुसऱ्या माळ्यावर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना लकडगंज परिसरातील गरोबा मैदान येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या माळ्यावर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना लकडगंज परिसरातील गरोबा मैदान येथे घडली. अनुज संदीप उईके असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
अनुजचे वडील संदीप उईके वाहन चालक आहेत. उईके दाम्पत्य गरोबा मैदान येथे भाड्याने राहते. अनुज त्यांचा एकुलता मुलगा आहे. इमारतीच्या तळमजल्यात्वर घरमालक आणि उईके राहतात. पहिल्या माळ्यावर इतर भाडेकरू राहतात. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अनुज खेळत होता. खेळता-खेळता तो दुसऱ्या माळ्यावरील छतावरील त्याने खाली वाकून पाहिले. तेव्हा घर मालकाची पत्नी खाली ब्रश करीत होती. तिने अनुजला खाली डोकावून पाहू नको असे म्हणत दूर जाण्यास सांगितले. अनुजला सांगून ती घरात गेली. त्याच दरम्यान अनुजचा तोल गेला आणि तो खाली पडला. अनुजला लगेच मेडिकलमध्ये नेण्यात आले. मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे. छतावर केवळ दोन फुट उंचीची भिंत आहे. भिंतीजवळ वाकून पाहिल्याने हा अपघात घडला. लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.