बांधकामस्थळी मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:06 AM2021-05-23T04:06:34+5:302021-05-23T04:06:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धोक्याच्या ठिकाणी मजुरांकडून काम करून घेताना सुरक्षेची उपाययोजना न केल्यामुळे एका मजुराचा नाहक जीव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धोक्याच्या ठिकाणी मजुरांकडून काम करून घेताना सुरक्षेची उपाययोजना न केल्यामुळे एका मजुराचा नाहक जीव गेला. त्यामुळे सोनेगाव पोलिसांनी कंत्राटदार तसेच सुपरवायझरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. राजू गभने आणि अजय कडक अशी आरोपींची नावे आहेत. मिहान परिसरात शिवकैलास बिल्डिंगचे काम सुरू आहे. येथे शुक्रवारी रात्री ७ वाजता सिमेंटचा ट्रक आला. त्यातून सिमेंटच्या बोऱ्या खाली करण्याचे काम रवी राजू दादरे (वय २८, रा. बालाघाट मध्य प्रदेश), सुनील पंचेश्वर (वय ४२, रा. चिंचभवन) आणि इतर मजूर करीत होते. अचानक इमारतीची भलीमोठी वीट राजू दादरेच्या डोक्यावर पडली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता त्यांनी राजूला मृत घोषित केले. या घटनेमुळे मजुरांमधील रोष उफाळून आला.
दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी कधीही काम करतात. मात्र, संबंधित कंत्राटदार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत नाही. रवी दादरेच्या डोक्यावर हेल्मेट असते तर त्याचा जीव वाचला असता. मात्र, कोट्यवधीचे बांधकाम करणारे कंत्राटदार मजुरांना साधे हेल्मेटही उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे गरीब मजुरांचा जीव जातो. प्राथमिक तपासात हा निष्काळजीपणा उघड झाल्यामुळे सोनेगाव पोलिसांनी सुनील पंचेश्वर यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानुसार आरोपी कंत्राटदार राजू गभने आणि सुपरवायझर अजय कडक या दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---