राज्यात गाजलेल्या  खैरलांजी हत्याकांडातील दोषसिद्ध आरोपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 10:01 PM2017-11-30T22:01:00+5:302017-11-30T22:06:57+5:30

Death of a convicted accused in Khairlanji murder case in the state | राज्यात गाजलेल्या  खैरलांजी हत्याकांडातील दोषसिद्ध आरोपीचा मृत्यू

राज्यात गाजलेल्या  खैरलांजी हत्याकांडातील दोषसिद्ध आरोपीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देकारागृहात ढासळली प्रकृतीसुपर स्पेशालिटीत झाला मृत्यू नागपूरच्या धंतोली ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमत
नागपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या  खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता.
देश-विदेशात चर्चेला आलेले खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात २९ सप्टेंबर २००६ ला घडले होते. या हत्याकांडाची धग भंडारा, नागपूर, मुंबईसह राज्यातील विविध शहरात पसरली होती. या हत्याकांडामुळे दगडफेक, जाळपोळ, मोर्चे, आंदोलनांनी अवघा महाराष्ट्रच ढवळून निघाला होता. संसदेतही या निर्घृण हत्याकांडाची दखल घेण्यात आली होती. तत्कालीन राज्य सरकारने जनभावना लक्षात घेत जलदगती न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार, असे जाहीर केले होते. राज्यभर आंदोलनांचे लोण उसळल्यानंतर सुमारे ७ महिन्यांनी कोर्टात दाखल झालेल्या आणि दीड वर्षे चाललेल्या या हत्याकांडाचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ११ पैकी गोपाल सक्रू बिंजेवार, सक्रू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, प्रभाकर मंडलेकर, जगदीश मंडलेकर, रामू धांडे आणि शिशुपाल धांडे या आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली तर, महिपाल धांडे, धर्मपाल धांडे आणि पुरुषोत्तम तितीरमारे यांना मुक्त केले. उच्च न्यायालयात दोन्ही पक्षातर्फे या शिक्षेच्या संबंधाने अपिल करण्यात आले. त्याचा निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांडे वगळता अन्य सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान, २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेला विश्वनाथ धांडे हा ९ वर्षांपासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी क्रमांक सी ७६६९ म्हणून बंदिस्त होता. बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी डॉक्टरांनी धांडेला मृत घोषित केले. ही माहिती गुरुवारी सकाळी धंतोली ठाण्यात कळविण्यात आली. धंतोली पोलिसांनी धांडेच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

धांडे दुसरा मृत आरोपी
या हत्याकांडात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मृत झालेला धांडे हा दुसरा आरोपी होय, अन्य आरोपींपैकी जगदीश मंडलेकर हा २०१२ मध्ये मृत झाला. मंडलेकर नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना १३ फेब्रुवारी २०१२ ला एका महिन्यासाठी पॅरोलवर खैरलांजी येथे आला होता. त्याला दम्याचा त्रास होता. तो अचानक वाढल्याने त्याच्या पॅरोलचा कालावधी पुन्हा एका महिन्याने वाढविण्यात आला. तो १३ एप्रिलला कारागृहात परत जाणार असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

 

Web Title: Death of a convicted accused in Khairlanji murder case in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू