तलावात बुडून गुराखी मुलाचा मृत्यू
By admin | Published: May 13, 2016 03:24 AM2016-05-13T03:24:24+5:302016-05-13T03:24:24+5:30
मालगुजारी तलावात शिरलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तलावात उतरलेल्या १२ वर्षीय गुराखी मुलाचा बुडून मृत्यू झाला.
धानला येथील घटना : मृतदेहाचा शोध सुरू, मासेमाऱ्यांची मदत
तारसा : मालगुजारी तलावात शिरलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तलावात उतरलेल्या १२ वर्षीय गुराखी मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील धानला येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिस्तोवर त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकातील सदस्यांना यश आले नव्हते.
जितेंद्र अनिल साकोरे (१२, रा. धानला, ता. मौदा) असे मृत मुलाचे नाव आहे. जितेंद्र व मनीष चंद्रशेखर मुंदेकर (९, रा. धानला, ता. मौदा) दोघेही गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांनी आपापली गुरे पाणी पाजण्यासाठी गावालगत असलेल्या मालगुजारी तलावाजवळ आणली. त्यातच तलावात शिरलेल्या म्हशी प्रयत्न करूनही तलावाबाहेर येत नव्हत्या. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी जितेंद्र तलावात उतरला. म्हशींना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो तलावातील गाळात फसला.
बराच वेळ होऊनही जितेंद्र तलावाबाहेर येत नसल्याचे किंबहुने; तो दिसत नसल्याने मनीषने लगेच गाव गाठले आणि सदर प्रकाराची माहिती आईवडिलांसह नागरिकांना दिली. पाहतापाहता तलावाजवळ नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच मौदा पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जितेंद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने नागपूरहून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, जितेंद्रचा थांगपत्ता लागला नाही.
धानला येथील हा तलाव प्राचीन असून, त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या तलावातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न चालविले. परंतु, त्याला स्थानिक मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. या तलावाच्या मध्यभागी मोठा खड्डा असून, त्यात गाळ साचला आहे. जितेंद्र हा त्या खड्ड्यात फसला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)