उपचाराअभावी दुचाकीचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:49+5:302021-08-12T04:12:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : भरधाव अज्ञात वाहनाने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : भरधाव अज्ञात वाहनाने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ते रात्रभर जखमी अवस्थेत घटनास्थळीच पडून हाेते. त्यांना वेळीच रुग्णालयात आणले असते तर ते बचावले असते, अशी प्रतिक्रिया डाॅक्टरांनी व्यक्त केली. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील नेरी शिवारात साेमवारी (दि. ९) मध्यरात्री घडली असून, मंगळवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली.
कैलास नत्थू खेडकर (४०, रा. पिपरी-कन्हान, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. ते एमएच-४०/क्यू-८८७१ क्रमांकाच्या माेटारसायकलने लिहिगाव (ता. कामठी) येथून पिपरी-कन्हानला जायला निघाले हाेते. नेरी (ता. कामठी) शिवारातील सर्व्हिस राेडवर अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. शिवाय, ते सर्व्हिस राेडलगतच्या गवतात पडून असल्याने त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.
मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास माहिती मिळाल्याने पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक विजय कार्वेकर करीत आहेत.