चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 10:28 PM2019-12-07T22:28:51+5:302019-12-07T22:28:58+5:30
खेळता खेळता पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडलेल्या ३ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला.
जलालखेडा : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडलेल्या ३ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. अर्णव (अंशू) कैलास घोरपडे (रा. खरबडी) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. नरखेड तालुक्यातील खरबडी येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
कैलास घोरपडे हे मुलगा आणि मुलीसह घरी टीव्ही पाहत होते. याचवेळी अर्णव बाहेर खेळायला गेला. यानंतर काही मिनिटांनी कैलास घोरपडे त्याला पाहायला घराबाहेर आले. अर्णव त्यांना अंगणात दिसला नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. परंतु तो दिसला नाही. यानंतर कैलास यांनी पाण्याच्या टाकीकडे जाऊन बघितले असता अर्णव टाकीत पडलेला दिसला. त्यांनी लगेच त्याला टाकीतून बाहेर काढले व जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वैखंडे यांनी तपासणी दरम्यान त्याला मृत घोषित केले.