नागपूर नजीकच्या देवलापार भागात बालकाचा डोहात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:28 PM2017-11-20T18:28:09+5:302017-11-20T18:34:01+5:30
कुटुंबासह सहलीसाठी आलेल्यांपैकी पुरुष फिरायला गेली. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. यातील काही पुरुष पोहायला डोहात उतरताच पाच वर्षीय बालकानेही डोहाच्या काठावर पाण्यात खेळायला सुरुवात केली. अनावधानाने तो खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला.
आॅनलाईन लोकमत
रामटेक : कुटुंबासह सहलीसाठी आलेल्यांपैकी पुरुष फिरायला गेली. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. यातील काही पुरुष पोहायला डोहात उतरताच पाच वर्षीय बालकानेही डोहाच्या काठावर पाण्यात खेळायला सुरुवात केली. अनावधानाने तो खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोंडीटोला शिवारात असलेल्या बावनथडी नदीतील डोहात रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
समृद्ध शैलेंद्र सप्रे (५) असे या दुदैवी बालकाचे नाव आहे. रविवारी सुटी असल्याने शैलेंद्र सप्रे, रा. नरेंद्रनगर, नागपूर हे त्यांच्या काही मित्रांसोबत कुटुंबासह गोंडीटोला परिसरातील शीतलामाता गडावर पिकनिक तथा देवदर्शनासाठी आले होते. महिला मंडळींनी मंदिराच्या परिसरात स्वयंपाकाला सुरुवात करताच पुरुष मंडळी फिरायला निघाली. त्यात समृद्धही त्याच्या वडिलांसोबत फिरायला गेला होता. त्यांना बावनथडी नदीच्या पात्रात डोह दिसताच ते पाण्यात पोहायला उतरले. समृद्ध हा काही वेळ काठावर बसला आणि नंतर तोही पाण्यात खेळण्यासाठी उतरला.
मात्र, अनावधानाने तो काही वेळातच खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्यावेळी त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. तो काठावर नसल्याचे लक्षात येताच वडिलांसह इतरांनी त्याचा शोध घेतला असता, तो पाण्यात बुडाल्याचे आढळून आले. त्यांनी समृद्धला शोधून पाण्याबाहेर काढले आणि लगेच रामटेक येथील डॉक्टरांकडे आणले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू घटनास्थळीच झाला असावा, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपासासाठी सदर प्रकरण देलापार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.