नागपुरात वीज कर्मचा-याचा करंटमुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:39 AM2018-06-10T00:39:04+5:302018-06-10T01:22:59+5:30
वीज दुरुस्तीचे काम करीत असताना खांबावर जिवंत विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका वीज कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज दुरुस्तीचे काम करीत असताना खांबावर जिवंत विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका वीज कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला. विनोद वासुदेवराव टेंभेकर (वय ३०) असे मृताचे नाव आहे. टेंभेकर मानकापूरच्या डोळे ले-आऊटमध्ये राहत होते. ३ जूनच्या पहाटे जरीपटक्यातील मयूरनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने ते वीज मंडळातील आपल्या सहकाऱ्यांसह पहाटे ५ वाजता मयूरनगरात गेले. खांबावर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांना विजेचा करंट लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता डॉक्टरांनी टेंभेकर यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या मृत्यूमुळे टेंभेकर परिवाराने कर्ता पुरुष गमावला आहे.
चौथ्या माळ्यावरून खाली पडून मजुराचा करुण अंत
भंडारा मार्गावरील सुभाषनगरात राहणारे दीपक शंकरराव कांबळे (वय ३८) यांचा चौथ्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला. कळमन्यातील महालगाव कापसीच्या उमिया मार्केटमध्ये दीपक कांबळे चौथ्या माळळ्यावर सेंट्रींगचे काम करीत होते. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता ते तोल गेल्याने तिसºया माळ्यावर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. गरीब कुटुंबातील दीपक कांबळे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. पोलीस अशा प्रकरणात गरीब ठेकेदाराला आरोपी बनवून इमारत निर्माण करणाºया तसेच ज्यांची प्रत्यक्ष सुरक्षेची जबाबदारी आहे, अशांना कारवाईपासून दूर ठेवतात. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गळफास लावून आत्महत्या
गंगाबाई घाट, स्वीपर कॉलनीत राहणारे रोशन संगीत सातपुते (वय ४५) यांनी शुक्रवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
तरुणाने जाळून घेतले
अजनीतील बजरंगनगरात राहणारे प्रवीण संजय चव्हाण (वय २९) यांनी १ जूनला दुपारी स्वत:ला पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये उपचार घेत असताना त्यांना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
चालू कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले
चालू कुलरमध्ये पाणी भरणे एका तरुणीच्या जीवावर बेतले. पठाण ले आऊट, त्रिमुर्ती नगरात राहणाऱ्या नेहा कासीम पठाण (वय २२) या शनिवारी सकाळी चालू असलेल्या कुलरमध्ये पाणी भरत होत्या. नेहा यांना कुलरचा करंट लागला. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना मेयोत नेले असता डॉक्टरांनी सकाळी ८.१० वाजताच्या सुमारास मृत घोषित केले.