नागपुरात ट्रकच्या धडकेत युवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:50 AM2019-03-17T00:50:39+5:302019-03-17T00:51:43+5:30
भरधाव ट्रकने धडक मारल्यामुळे दुचाकीवरील एका युवतीचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भंडारा मार्गावर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रकने धडक मारल्यामुळे दुचाकीवरील एका युवतीचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भंडारा मार्गावर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
रश्मी श्यामसुंदर खन्ना (वय २७) असे मृत युवतीचे नाव आहे. ती म्हाडा कॉलनी हिंगणघाट येथील रहिवासी होती. रश्मी तिच्या दुचाकीने दुपारी ४.३० च्या सुमारास भंडारा मार्गाने जात असताना वेगात आलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३१/ सीबी ०८१३ च्या चालकाने तिला जोरदार धडक मारली. त्यामुळे रश्मीचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमवाला शांत केले. त्यानंतर आरोपी ट्रकचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे.
विषारी वायुने गुदमरल्याने एकाचा करुण अंत
गटरची सफाई करताना विषारी वायुने गुदमरल्याने प्रकृती ढासळून एका व्यक्तीचा करुण अंत झाला. हरिदास भजन देशभ्रतार (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते शांतिनगरातील मुदलियार चौकाजवळ राहत होते. शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता ते प्रजापतीनगर, नंदनवनमधील एका गटाराची सफाई करत असताना त्यांना गुदमरल्यासारखे झाले. ते बेशुद्ध पडले त्यामुळे सहकाऱ्यांनी देशभ्रतार यांना लगेच मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी देशभ्रतार यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
गळफास लावून आत्महत्या
सीताबर्डीच्या कोष्टीपुरा रेणुकामाता सोसायटीत राहणारे विनोद नत्थूजी गोंडाणे (वय ३५) यांनी शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. उषाराम नत्थुजी गोंडाणे (वय ७०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
विहिरीत मृतदेह आढळला
रमेश बघूजी चांदेकर (वय ४२, रा. अंबर कॉलनी साईनगर दाभा) यांचा मृतदेह गिट्ठीखदानमधील अंतरभारती आश्रमच्या परिसरातील विहिरीत आढळला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर चर्चेला उधाण आले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.