जमावाने ठेचलेल्या गुंड ‘शक्तीमान’चा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:26+5:302021-07-27T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - संतप्त जमावाच्या रोषाला बळी पडल्याने गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल असलेला शक्तीमान ऊर्फ शिवम गुरुदेव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - संतप्त जमावाच्या रोषाला बळी पडल्याने गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल असलेला शक्तीमान ऊर्फ शिवम गुरुदेव (वय १९) याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो तीन दिवसांपासून मेडिकलमध्ये जीवन मृत्यूशी लढत होता. त्याच्या मृत्यूमुळे अजनी पोलिसांनी आरोपी आकाश मनवर, प्रीतम कावरे, सुरेश कामडे, बिरजू शिंदे, सुनील वानखेडे आणि अभिषेक घोडेस्वार या आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला.
शुक्रवारी रात्री आरोपी शक्तीमान, निशांत घोडेस्वार आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काैशल्यानगरात स्वयंदीप ऊर्फ स्वयंम नगराळे (वय २१) याची निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणात शक्तीमान, निशांत घोडेस्वार आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. घोडेस्वार आणि अन्य दोन साथीदार पोलिसांच्या हाती लागले. मात्र, शक्तीमान त्याच्या मामाच्या भांडेप्लॉट येथील घरी जाऊन लपला. स्वयंदीपच्या हत्येने काैशल्यानगरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. काही जणांनी आरोपी शक्तीमानला शोधून काैशल्यानगरात आणले आणि शनिवारी सकाळी तो नजरेस पडताच त्याला संतप्त जमावाने दगडविटांनी ठेचून काढले. काही अंतरावरच असलेले पोलीस धावले. त्यांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुपारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात शक्तीमानवर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
---
कुख्यात खाटिकचा होता नंबरकारी
आरोपी शक्तीमान हा कुख्यात गुंड दत्तू खाटीक याचा नंबरकारी (खास साथीदार) होता. दत्तू खाटिकसोबत राहून राहूनच त्याला दारू-गांजाचे व्यसन जडले. त्यातूनच तो गुन्हेगारीत शिरला. सामूहिक बलात्काराच्या आरोपात खाटिक कारागृहात गेल्यानंतर आरोपी शक्तीमान दारू आणि जुगार अड्डा चालवू लागला होता.
----
पोलिसांवर होणार कारवाई
एकाची हत्या झाल्यानंतर १२ तासात त्याच ठिकाणी संतप्त जमावाने हत्या करणाऱ्या गुंडास ठेचून काढल्याने पोलिसांचीही नाचक्की झाली आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पाहिजे तसे प्रयत्न केले नसल्याचा आरोप होत असल्याने अजनीतील काही पोलिसांची ‘खून का बदला खून’मध्ये विकेट जाणार असल्याची चर्चा आहे.
----
पोलिसांची विकेट जाणार ?
अवघ्या १२ तासात दोघांची हत्या झाल्याने काैशल्यानगरात रोष आणि तणाव आहे. पुन्हा अशी काही घटना घडू नये म्हणून पोलिसांनी या भागात अस्थायी पोलीस चाैकी उभारली आहे.
----