हरीश अड्याळकर यांचे निधन; लोहियांचा सच्चा समाजवादी हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 10:53 PM2020-09-03T22:53:19+5:302020-09-03T22:56:35+5:30
गांधीवाद आणि लोहियावाद विचारांची आजीवन जोपासना करणारे ज्येष्ठ सामाजसेवक आणि लोहिया अध्ययन केंद्राचे महासचिव हरीश अड्याळकर यांचे गुरुवारी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधीवाद आणि लोहियावाद विचारांची आजीवन जोपासना करणारे ज्येष्ठ सामाजसेवक आणि लोहिया अध्ययन केंद्राचे महासचिव हरीश अड्याळकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
अड्याळकर म्हणजे एक सच्चा समाजवादी. उमेश चौबे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने समाजसेवेचे व्रत स्वीकारून कार्य करणारा एक सच्चा कार्यकर्ता आज निवर्तला. मुंबई येथे रेल्वेमध्ये सेवा देताना चळवळ्या स्वभावानुसार ते रेल्वे युनियनशी जुळले. अनेक विचारांचा अभ्यास करताना आधी डाव्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. मात्र पुढच्या काळात राममनोहर लोहिया यांचा झंझावात त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. १९६५ साली ते मुंबई सोडून नागपूरला आले ते लोहिया विचारांचा पाईक म्हणूनच.
अड्याळकर यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मोठी लढाई लढली. १९७४ साली नागपूर मंडळात झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संप आंदोलनाचे नेतृत्व केले. ते नागपूर रेल्वे कामगार युनियनचे सचिवही राहिले. या काळात ते भूमिगतही होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. ते डॉ. राममनोहर लोहिया व त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांच्या सोबत काम केले होते. त्यांना नागपुरातील जॉर्ज फर्नांडिस म्हटले जात होते. स्वत:ला लोहिया यांचे समाजवादी पाईक म्हणणाऱ्या अड्याळकर यांनी सुभाष रोडवरील लोहिया अध्ययन केंद्राची धुरा गेल्या ४० वर्षांपासून सांभाळली होती. त्या माध्यमातून लोहिया विचारांच्या प्रचार व प्रसाराचे काम त्यांनी केले.
अनेक लेखक, साहित्यिक आणि रेल्वे युनियनच्या नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाने एक सच्चा समाजवादी आणि गांधी आणि लोहिया विचारांचा पाईक हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.