परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:01+5:302021-05-31T04:07:01+5:30
नागपूर : परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या असून, मे महिन्यात नऊ जणांचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाला ...
नागपूर : परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या असून, मे महिन्यात नऊ जणांचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाला आहे. संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एका मजुराचा मृत्यू झाला.
मन्सूर साई (४२, रा. मुजफ्फरपूर, बिहार), असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तो रेल्वेगाडी क्रमांक ०२२९५ संघमित्रा एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस ९, बर्थ १, २, ३ वरून पत्नी आणि इतर दोन नातेवाइकांसह प्रवास करीत होता. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये लॉकडाऊनमुळे त्याची मजुरी बंद झाली होती. अशातच प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे तो आपल्या गावाकडे परत जात होता; परंतु प्रवासातच त्याची प्रकृती बिघडली. गाडीतील टीटीईने याची माहिती नागपूरच्या उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. उपस्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. ही गाडी सकाळी ८.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक १ वर पोहोचताच रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने टाहो फोडला. लोहमार्ग पोलिसांतील हेड कॉन्स्टेबल तेजराम वघारे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
...............
दोन महिन्यांत १४ जणांचा मृत्यू
एप्रिल आणि मे महिन्यात रेल्वे प्रवासात, तसेच रेल्वेस्थानकावर मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात एप्रिल महिन्यात ३ अनोळखी, तर २ ओळखीच्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर मे महिन्यात ३ ओळखीच्या आणि ६ अनोळखी प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांनी केली आहे.
..........