अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:06 AM2021-05-23T04:06:48+5:302021-05-23T04:06:48+5:30
दुचाकी चालविण्यासाठी देणारा ठरला दोषी : अंबाझरीत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकी ...
दुचाकी चालविण्यासाठी देणारा ठरला दोषी : अंबाझरीत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यास देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. त्या अल्पवयीन मुलाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार ठरवून अंबाझरी पोलिसांनी दुचाकी मालक प्रवीण बलितकुमार बारसिंगे (वय ३०, रा. जयनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बारसिंगे यांचे जयनगरात किराणा दुकान आहे. पीयूष नामक १५ वर्षीय मुलगा त्याच्याकडे नेहमी येत होता. छोटी-मोठी कामे करून दिल्याच्या बदल्यात बारसिंगेची दुचाकी पीयूष फिरवत होता. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास बारसिंगेची दुचाकी घेतली आणि पीयूष सुसाट वेगाने निघाला. अंबाझरी बायपास रोडवर दुभाजकाला दुचाकी धडकली आणि पीयूष खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला रविनगर चौकातील खासगी इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा जबाब नोंदवला. मृत पीयूष अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपी प्रवीण बारसिंगे यांनी त्याला दुचाकी चालवण्यासाठी दिली. अर्थात बारसिंगेंनी दुचाकी दिली नसती तर हा अपघात घडला नसता, असा निष्कर्ष काढून अंबाझरी पोलिसांनी बारसिंगेविरुद्ध कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल केला.
---