नागपुरात इस्पितळाच्या हलगर्जीपणामुळे नवमातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:14 PM2018-11-03T13:14:20+5:302018-11-03T13:16:12+5:30
बाळंतपणानंतर सातत्याने दोन महिने दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर बाळाच्या आईचा मृत्यू झाला अन् संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.
मेघा तिवारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नानंतर पाच वर्षांनी संसारवेलीवर अपत्यरूपी फूल उमलल्याने ते आनंदी होते. मात्र चिमुकल्याला जवळ घेऊन त्याचे लाड करण्याची संधीदेखील त्याच्या मातेला मिळाली नाही. बाळंतपणानंतर सातत्याने दोन महिने दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर बाळाच्या आईचा मृत्यू झाला अन् संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आपल्या बाळावर एकाप्रकारे अन्यायच झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच पत्नी निकिता हिचा मृत्यू झाला आहे, असा आरोप अमित तिडके यांनी लावला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे.
२८ आॅगस्ट रोजी निकिता तिडके यांना प्रसूतीसाठी गांधीबाग येथील अरिहंत इस्पितळात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ.विनय रोडे यांनी ‘सिझर’ करून प्रसूती केली. मात्र हे करण्याअगोदर रक्ताची तपासणी किंवा शस्त्रक्रियेअगोदरच्या चाचण्या करण्यात आल्या नाही. त्यानंतर निकिता यांची प्रकृती ढासळत गेली. २८ आॅगस्ट रोजीच्या चाचण्यांमध्ये ‘टीएलसी’चे (टोटल ल्युकोसाईट काऊंट) व ‘एससी’चे (सिरम क्रिएटीन) प्रमाण सामान्य होते. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचे संतुलन बिघडल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर ‘किडनी’ व ‘लिव्हर’ची समस्या निर्माण झाली. यासंदर्भात डॉ.रोडे यांनी आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही. तुमच्या पत्नीला दोन दिवसांत सुटी होईल, असेच ते सांगत होते. ३० आॅगस्ट रोजी निकिता यांची प्रकृती आणखी खराब झाली. प्रसूती शस्त्रक्रियेनंतर लावलेल्या टाक्यांमुळे संसर्ग झाला होता. अरिहंत इस्पितळात ‘आयसीयू’ नसल्याने त्यांना दुसऱ्या इस्पितळात उपचारांसाठी नेण्याचा अमित यांनी निर्णय घेतला. यावेळी डॉ.रोडे यांनी तपासण्याचीदेखील तसदी घेतली नाही. दुसºया इस्पितळात लगेच सर्व चाचण्या करण्यात आल्या. यावेळी निकिता यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्याचे दिसून आले. तसेच ‘किडनी’ व ‘लिव्हर’वरदेखील सूज आली होती. त्यानंतर १० आॅक्टोबर रोजीदेखील एक शस्त्रक्रिया झाली. मात्र अखेर निकिता यांचा २४ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला.डॉ.विनय रोडे यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केले होते. तसेच चाचण्या न करताच शस्त्रक्रिया केली. टाकेदेखील चुकीच्या पद्धतीने घातले. यामुळेच निकिताला विविध संसर्ग झाले. आम्हाला कुठलेही पैसे किंवा नुकसानभरपाई नको. मात्र भविष्यात असे कुणासोबत होऊ नये अशी भावना अमित तिडके यांनी व्यक्त केली. तिडके यांनी डॉ.विनय रोडे यांच्याविरोधात तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच ‘आयएमए’, जिल्हाधिकारी यांच्याकडेदेखील तक्रार केली आहे.
अहवालानंतर कारवाईचा निर्णय : ‘आयएमए’
यासंदर्भात ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ.आशिष दिसावल यांना विचारणा केली असता आम्हाला तक्रार प्राप्त झाल्याचे त्यांनी मान्य केले. आम्ही ही तक्रार रुग्ण तक्रार समितीकडे पाठविली आहे. संपूर्ण चौकशी करून आठवड्याभरात ही समिती अहवाल सादर करेल. या अहवालानंतरच कारवाईबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.
कुटुंबाला सर्व माहिती दिली : डॉ. रोडे
डॉ.विनय रोडे यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. ‘अरिहंत’मध्ये असताना रुग्णाची तब्येत चांगली होती. मात्र आमच्याकडून पैसे उकळण्यासाठी असे आरोप लावण्यात येत आहेत. कुटुंबाला सर्व माहिती दिली होती व त्यानंतरच सर्व निर्णय घेतले होते, असा दावा डॉ.रोडे यांनी केला.