नागपूर कारागृहातील कर्मचाऱ्याचा आणि कैद्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:57 AM2020-07-26T00:57:02+5:302020-07-26T00:58:38+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी आणि एका कैद्याचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या वेळी शनिवारी या दोन्ही घटना घडल्या. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी आणि एका कैद्याचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या वेळी शनिवारी या दोन्ही घटना घडल्या. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
येथील मध्यवर्ती कारागृहात जेल रक्षक संजय विठोबा ठाकरे हे शुक्रवारी रात्री मेन गेटवर कर्तव्यावर हजर होते. शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडून बेशुद्ध झाले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ठाकरे यांचा मृत्यू नेमका कसा झाला, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून चर्चेला आलेल्या मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्याचा अचानक असा मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याच कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे अशोक गुलाबराव चौधरी (वय ५३) नामक कैद्याची १७ जुलैला प्रकृती बिघडल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी चौधरी याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा, असा संशय आहे. मात्र या संशयाला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच काय ते सांगू, असे पोलीस म्हणतात. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.