'त्या' बालिकेचे निधन, विमानातच हृदयविकाराचा तीव्र झटका
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 31, 2023 06:49 PM2023-08-31T18:49:00+5:302023-08-31T18:49:24+5:30
विस्ताराचा बेंगळुरू-दिल्ली प्रवास
नागपूर : विस्तारा विमान कंपनीच्या बेंगळुरू ते दिल्ली विमानात एका १५ महिन्याच्या बालिकेला २७ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर विमान आपत्कालिन परिस्थितीत नागपुरात उतरविण्यात आले होते. तिच्यावर किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तीन दिवसांच्या अथक संघर्षानंतर ३१ ऑगस्टला पहाटे ३.१५ वाजता तिची प्राणज्योत मावळली.
बालिकेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली होती. त्यावेळी विमानात प्रवास करणाऱ्या दिल्ली एम्सच्या डॉ. नवदीप कौर, डॉ. दमणदीप सिंग, डॉ. रिषभ जैन, डॉ. ओशिखा आणि डॉ. अविचला तक्षक या पाच डॉक्टरांनी तिच्यावर विमानातच तब्बल ४५ मिनिटे उपचार केले होते. त्यावेळी तिचा श्वास सुरू झाला होता. विमान नागपूर विमानतळावर उतरविल्यानंतर तिला तातडीने किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान तिचे मूत्रपिंड निकामी झाले होते आणि तिला अनेक विकारांनी ग्रासले होते. या बालिकेला जन्मजात हृदयविकाराचा त्रास होता. तिच्यावर बेंगळुरू येथील नारायणा हेल्थ येथे हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम्स-किंग्जवे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही ती वाचू शकली नाही. गुरुवारी पहाटे ३.१५ वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.