विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:42 AM2023-04-10T11:42:35+5:302023-04-10T11:44:45+5:30
राजनगरमधील घटना : विजेचा धक्का की विषारी वायूमुळे श्वास गुदमरला?
नागपूर : सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजनगरमधील स्टेट बँक कॉलनीत विहीर स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या दोन तरुण मजुरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. अमन रतनलाल मरकाम (२२) आणि शंकर अर्जुन उईके (२२), अशी मृत मजुरांची नावे असून, ते सिद्धार्थनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी होते. या दोघांचा मृत्यू विहिरीतील विषारी वायूमुळे श्वास गुदमरल्याने झाला की पाण्याच्या मोटारीतून विजेचा धक्का लागला ही बाब स्पष्ट होऊ शकलेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
प्लॉट क्र. १५ रहिवासी डॉ. सुनील नरसिंह राव यांच्या अंगणात असलेली विहीर स्वच्छ करण्यासाठी दोन्ही मजुरांना बोलाविण्यात आले होते. सुरुवातीला अमन साफसफाईसाठी ५५ फूट खोल विहिरीत उतरला, तर शंकर विहिरीबाहेर उभा होता. दरम्यान, काही वेळातच अमन बेशुद्धावस्थेत विहिरीत खाली पडला. हे पाहून शंकर अमनला वाचविण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, तोदेखील बेशुद्ध होऊन पाण्यात पडला. ही बाब समजताच स्थानिकांनी सदर पोलिस व अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी हुकच्या साहाय्याने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर दोघांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन्ही मजुरांना मृत घोषित केले. तक्रारदार किशोर उईके यांच्या फिर्यादीवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत्यू नेमका कशाने ?
या घटनेची माहिती मिळताच अमन व शंकरचे नातेवाईक मोठ्या संख्येने राजनगरमध्ये पोहोचले. विहिरीत उतरल्यानंतर दोघांनी बराच वेळ आतून गाळ बाहेर काढला. मात्र, इतक्यात कुणीतरी विहिरीत लावलेली मोटार सुरू केली. त्यामुळे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता व अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला. या दोघांचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.