नागपुरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:02 AM2018-01-17T00:02:47+5:302018-01-17T00:03:44+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केला असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी कामगार विमा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केला असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी कामगार विमा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
दीपक गणपतराव ब्राह्मणकर (३८) रा. यवतमाळ, हल्ली मु. बुटीबोरी असे कामगार रुग्णाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष केअरवेल सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायजर पदावर दीपक ब्राह्मणकर कामाला होते. त्यांना काही दिवसांपासून पोटाचा त्रास होता. २७ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांनी सोमवारीपेठ येथील कामगार विमा रुग्णालयात तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी हर्निया शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी १५ जानेवारी २०१८ ची तारीख दिली. सकाळी ९.३० वाजता ते रुग्णालयात आले. डॉक्टरांनी भरती करून घेतले. त्यांच्या सोबत पत्नी आशा ब्राह्मणकर होती. ब्राम्हणकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, पतीला भरती होऊन २४ तास झाले तरी उपचाराला सुरुवात झाली नव्हती. साधी सलाईनही लावली नव्हती. भरती झाले तेव्हा पती चांगलेच होते. नाश्ता, जेवण देऊ नका असे डॉक्टरांनी सांगून सकाळी त्यांना शस्त्रक्रियेसाठी तयार केले. दीपक यांच्यासह इतर चार रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले होते. दीपक यांचा पहिला क्रमांक होता. शस्त्रक्रियेसाठी नेण्यापूर्वी कुठलीही तपासणी करण्यात आली नव्हती. त्यांचे केसपेपरसुद्धा तयार केले नव्हते. त्यामुळे डॉक्टर व स्टाफला रुग्णाचे नाव काय आहे, याचीसुद्धा माहिती नव्हती. शस्त्रक्रियागृहात नेले तेव्हा उपस्थित डॉक्टरांनी बधिरीकरणाचा डोज दिला. परंतु हा डोज जास्त झाला की काय १५-२० मिनिटांमध्ये डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. डॉक्टर काही सांगायला तयार नव्हते. डॉक्टरांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली. परिचारिका, मला व ‘आरएमओ’ला रुग्णवाहिकेत बसवून १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास धंतोली येथील केअर हॉस्पिटलमध्ये पाठविले. या दरम्यान, पतीची हृदयगती बंद होती. आॅक्सिजन मास्क नाकाऐवजी तोंडात टाकले होते. रक्तसुद्धा निघत होते. केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तपासून एक-दीड तास उपचार केले. परंतु नंतर मृत घोषित केले. पतीचा मृत्यू विमा रुग्णालयातच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला. बेजबाबदार डॉक्टर व स्टाफची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.