निपाह मेंदूज्वरामुळे मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 09:44 PM2018-12-22T21:44:37+5:302018-12-22T21:50:13+5:30
रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते.
निपाह मेंदूज्वराचे पहिल्यांदा रुग्ण १९९८ मध्ये क्वालालम्पूरजवळील निपाह या गावी दिसून आले. लवकरच तो इतर गावात आणि सिंगापूरलादेखील पसरला. येथे आणि डुकरांना हा रोग झाला आणि नंतर तो डुकराची पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. त्यावेळी २६५ रुग्णांची नोंद झाली. त्यातल १०४ रुग्ण दगावले. २००१ मध्ये सिलिगुडी येथे ६६ रुग्णांची नोंद झाली होती.
फळ खाणाऱ्या वटवाघुळांमध्ये हे विषाणू घर करून राहतात आणि नंतर जनावराच्या किंवा मनुष्याच्या शरीरात जातात आणि रोग पसरतो. वटवाघुळाला मात्र हा रोग होत नाही. मात्र त्याची लाळ आणि विष्टेमुळे फळ बाधित होतात आणि ही फळं माणसाने किंवा जनावरांनी खाल्ली तर त्यांना निपाहची लागण होते. हा रोग अतिशय लागट आहे. यामुळे विषाणुबाधित ताडी प्याल्यामुळेसुद्धा माणसामध्ये संसर्ग होतो. हा विषाणू माणसापासूनसुद्धा पसरतो. सिलिगुडी आणि बांगला देशमध्ये ६५ टक्के रुग्ण हे दवाखान्यातील कर्मचारी किंवा सुरुवातीच्या रुग्णाचे नातेवाईक होते.
सात दिवसांत मृत्यूमुखी पडतात रुग्ण
या भयंकर रोगाकरिता औषध नाही आणि प्रतिबंधक लसदेखील नाही. रोग कमी प्रमाणात दिसतो. परंतु घातक आहे. कारण, लक्षणे दिसताच सात दिवसांत या रोगाने रुग्ण दगावतो. औषधी नसल्यामुळे या रोगापासून बचाव करण्याची गरज आहे, असे जागतिक टॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.