शेजाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:28 PM2018-08-17T22:28:06+5:302018-08-17T22:29:52+5:30
क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादाचे स्वरूप हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे आता मारहाण करणाऱ्या मामा-भाच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादाचे स्वरूप हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे आता मारहाण करणाऱ्या मामा-भाच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. विशाल उर्फ बाळू नगराळे आणि आयुष मेश्राम असे मारहाण करणाऱ्या मामा-भाच्याचे नाव आहे. तर, विनोद नामदेवराव नारायणे (वय ५२) असे मृताचे नाव आहे.
मृत विनोद नारायणे आणि आरोपींची घरे इमामवाड्यातील पाच नल चौकाजवळ आहे. ७ आॅगस्टला दुपारी १ ते २ च्या दरम्यान कचरा जाळण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी विशाल आणि आयुषने विनोद नारायणे यांना जबर मारहाण केली. मारहाणीत ते खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. परिणामी त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी प्रारंभी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर या प्रकरणात आरोपींविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.