नागपूरच्या सतरंजीपुऱ्यातील फिरस्त्याचा मृत्यू : कोरोनाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:51 PM2020-06-01T22:51:54+5:302020-06-01T22:53:28+5:30
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आणि इकडे तिकडे फिरून मिळेल ते खाऊन मिळेल त्या ठिकाणी झोपणाऱ्या एक फिरस्त्याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. तो सतरंजीपुरा येथील रहिवासी असल्यामुळे त्याला कोरोनाची बाधा झाली होती काय, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आणि इकडे तिकडे फिरून मिळेल ते खाऊन मिळेल त्या ठिकाणी झोपणाऱ्या एक फिरस्त्याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. तो सतरंजीपुरा येथील रहिवासी असल्यामुळे त्याला कोरोनाची बाधा झाली होती काय, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
शेख अब्दुल नामक हा ४० वर्षीय व्यक्ती सतरंजीपुऱ्यातील छोटी मशिदीजवळ राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तो दिवसभर विविध भागात फिरत राहायचा. मिळेल ते खाणे आणि कुठेही झोपणे, अशी त्याची दिनचर्या होती. चार दिवसापूर्वी त्याला प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार करून त्याला सुटी दिली. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अग्रसेन चौकाजवळ फूटपाथवर तो बेशुद्धावस्थेत दिसून आला. ही माहिती कळल्यानंतर पोलीस तेथे पोहचले. डॉक्टरांनाही बोलावून घेतले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सतरंजीपुरा कनेक्शन असल्यामुळे डॉक्टरांनी त्याचे कोरोना नमुने घेतले. तो कोरोनाबाधित होता की नाही याचा अहवाल डॉक्टरांनी अद्याप दिलेला नाही. तूर्त गणेशपेठ पोलिसांनी शकीनाबी शेख अब्दुल हाफिज (वय ७०) यांनी दिलेल्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.