वेगळ्या विदर्भ चळवळीचे शिलेदार राम नेवले यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 09:51 AM2021-11-17T09:51:59+5:302021-11-17T09:52:41+5:30
मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
विदर्भ राज्य आंदोलन पार्टी व नुकत्याच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांचे मंगळवार, १६ रोजी मध्यरात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. ८ आॅक्टोबर १९५१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे.
मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी कृषी, सामाजिकसह इतर क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते मूळचे नागपूर जिल्ह्यातील नरखेडचे होते. तिथे त्यांचे कृषी सेवा केंद्र होते. १९८४ मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली.
सुरूवातीला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार असलेले नेवले कालांतराने संघटनेतून बाहेर पडले. नंतरचे सर्व आयुष्य त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी झोकून दिले. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी शेवटपर्यत लढा दिला. नुकतीच त्यांनी महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्यासाठी जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. "तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे,' यासाठी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारन एचटीबीटी बियाण्याची लागवड केली.