आरोपीला फाशी की जन्मठेप?
By admin | Published: April 13, 2016 03:21 AM2016-04-13T03:21:31+5:302016-04-13T03:21:31+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी चंद्रपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरविले.
हायकोर्टात आज निर्णय : चंद्रपुरातील तिहेरी हत्याकांड
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी चंद्रपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरविले. शिक्षेवर बुधवारी निर्णय देण्यात येणार आहे. आरोपीची फाशीची शिक्षा कायम राहते की, जन्मठेपेत परिवर्तित होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इमदाद अली वाहेद अली (५५) असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी, मुलगी व सासूची चाकू भोसकून हत्या केली आहे. आरोपीच्या पत्नीचे नाव शमशाद अली (४०), मुलीचे नाव इसाना अली (१९) तर, सासूचे नाव हारुनिसा हबिब खान (६०) होते. याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी पूर्ण झाली. आरोपी पक्ष व सरकार पक्ष यांचे वकील बुधवारी शिक्षेवर युक्तिवाद करतील. यानंतर न्यायालय शिक्षा जाहीर करेल.
ही घटना २ एप्रिल २०१४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली होती. आरोपी मातानगर ता. तुमसर जि. भंडारा येथील मूळ रहिवासी आहे. तो पत्नी व मुलीसह सासरी चंद्रपूर येथे आला होता.
घटनेच्या दिवशी आरोपीचे क्षुल्लक कारणावरुन पत्नी व सासूसोबत भांडण झाले. दरम्यान, त्याने रागाच्या भरात पत्नी, मुलगी व सासूवर चाकुने वार केले. पत्नी व मुलगी जागेवरच ठार झाली तर, सासूचा ५ एप्रिल २०१४ रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपीचा मुलगा आसिल इमदाद अली सय्यद यांनी रामनगर पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदविली होती.
३ डिसेंबर २०१५ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत फाशी तर, कलम २०१ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. यानंतर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३६६ अनुसार हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले. तसेच, आरोपीने अपील दाखल करून शिक्षेला आव्हान दिले. आरोपीतर्फे अॅड. एफ. एन. हैदरी तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विनोद ठाकरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
आदेशातील महत्त्वाचे मुद्दे
आरोपीविरुद्ध तिहेरी हत्येचा गुन्हा सिद्ध होण्यास प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व मयत हारुनिसा (आरोपीची सासू) हिचे शेजारी तवंगर खान यांचे बयान आणि त्यांच्या बयानाशी साम्यता दर्शविणारे परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वपूर्ण ठरले. तवंगर खान यांचे घर हारुनिसाच्या घरापुढे आहे. घटनेच्या दिवशी ते घरीच होते. आरोपीला मयतांवर हल्ला करताना त्यांनी पाहिले होते. तवंगर खान यांचे बयान न्यायालयाने विश्वासार्ह ठरविले. तसेच, एफआयआर, चाकूची जप्ती, आरोपीने घटनास्थळ दाखविणे, वैद्यकीय अहवाल इत्यादी परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्या बयानाशी साम्यता दर्शविणारे असल्याचे स्पष्ट केले.
सरकारी पक्षाने हारुनिसाची दोन मृत्यूपूर्व बयाने न्यायालयात सादर केली होती. ही दोन्ही बयाने उच्च न्यायालयाने संशयास्पद ठरविली. तपास अधिकाऱ्याने नोंदविलेल्या बयानाच्या सुरुवातीला व शेवटी हारुनिसा ही बयान देण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होती असा डॉक्टरचा शेरा लिहिण्यात आला नाही. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या दुसऱ्या बयानात वेळ नमूद करण्यात आली नाही. यासह विविध बाबी लक्षात घेता दोन्ही बयान विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने सांगितले. रुग्णालयात भरती केले तेव्हा हारुनिसाची अवस्था चांगली नव्हती असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.