फाशी की जन्मठेप?
By admin | Published: February 3, 2016 03:02 AM2016-02-03T03:02:30+5:302016-02-03T03:02:30+5:30
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या लकडगंजच्या छाप्रूनगर गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप व निरागस बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्यात ....
दवारे आणि सिंगला आज सुनावणार शिक्षा
युग चांडक खून खटला
नागपूर : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या लकडगंजच्या छाप्रूनगर गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप व निरागस बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय दोष सिद्ध झालेल्या दोन्ही आरोपींंना उद्या बुधवारी फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावणार आहे.
राजेश धनालाल दवारे (२०) रा. वांजरी ले-आऊट कळमना आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत.
दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा मुलगा युग याचे या दोन्ही नराधमांनी खंडणी आणि सूड उगवण्यासाठी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छाप्रूनगर भागातील गुरुवंदना सोसायटी समोरून जांभळ्या रंगाच्या स्कूटीने अपहरण केले होते.
त्याला मोटरसायकलने दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्याजवळ नेले होते. त्याचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. मृतदेह रेतीमध्ये दाबून पालापाचोळा झाकलेला होता, डोक्यावर मोठा दगड ठेवला होता. २ सप्टेंबर २०१४ रोजी लकडगंज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. लकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाने ५० साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर (होस्टाईल) झाला नाही. बचाव पक्षाने सात साक्षीदार तपासले. न्यायालयात दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या १२० - ब (फौजदारी कट), ३६४-ए (खंडणीसाठी अपहरण), ३०२ (हत्या),२०१ (पुरावा नष्ट करणे) हे आरोप सिद्ध झाले. उद्या बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा, अॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींच्यावतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय, अॅड. प्रमोद उपाध्याय, अॅड. राजेश्री वासनिक यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)