आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू : प्रशासनात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:14 PM2019-03-26T22:14:13+5:302019-03-26T22:15:15+5:30
नरखेडनजीकच्या पिठोरी येथील स्व. गंगाधरराव कोरडे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यश नीलेश उईके (९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. यश हा मूळचा पांढुर्णा तालुक्यातील ढोलनी येथील राहणारा आहे. तो त्याच्या भावासह या आश्रम शाळेत शिक्षण घेत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (नरखेड) : नरखेडनजीकच्या पिठोरी येथील स्व. गंगाधरराव कोरडे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यश नीलेश उईके (९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. यश हा मूळचा पांढुर्णा तालुक्यातील ढोलनी येथील राहणारा आहे. तो त्याच्या भावासह या आश्रम शाळेत शिक्षण घेत होता.
होळीसाठी गावाला गेलेला यश २५ मार्च रोजी सकाळी शाळेत आला. शाळेच्या प्रतिदिनानुसार सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण घेतल्यानंतर तो मित्रांसोबत खेळलाही. मात्र सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्याला ओकाऱ्या व्हायला सुरुवात झाली. शाळेतील शिक्षकांनी त्याला उपचारासाठी नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशची प्रकृती साधारण असल्याने त्याला सुटी दिली. शिक्षक त्याला आश्रम शाळेत घेऊन आले. संध्याकाळी तो त्याचा मोठा भाऊ राजा उईके याच्याजवळ झोपला. निवासी शिक्षक त्याच्या प्रकृतीकडे झोपेपर्यंत लक्ष ठेवून होते. मंगळवारी शाळेच्या नियमावलीनुसार सकाळी ५.३० वाजता सर्व विद्यार्थ्यांना दिनचर्येसाठी उठविण्यात आले. परंतु सर्व विद्यार्थी उठल्यानंतर यश उठला की नाही याची विचारपूस करण्याकरिता निवासी शिक्षक त्याच्याजवळ गेले असता तो निपचित पडलेला होता. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्याला सकाळी ६ वाजता नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर यशचा मृतदेह नातेवाईकाकडे सुुपूर्द करण्यात आला. यशच्या मृत्यूची नोंद नरखेड पोलिसांनी घेतली असून, ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
प्रशासनात खळबळ
आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे कळताच नागपूरचे आदिवासी विकास प्र्रकल्प अधिकारी डिगांबर चौव्हाण, तहसीलदार हरीश गाडे, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वनकडस हे पिठोरी येथील आश्रम शाळेत दाखल झाले. त्यांनी शाळेची प्राथमिक पाहणी केली. यानंतर नरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या अधिकाऱ्यांची बैठक झाली.