विद्युत धक्क्याने विद्यार्थ्याचा शाळेतच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:55 PM2018-07-13T23:55:49+5:302018-07-13T23:57:16+5:30
शाळेच्या आवारात खेळत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ ताराला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विद्युत धक्का बसला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळेच्या आवारात खेळत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ ताराला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विद्युत धक्का बसला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्यावेळी शाळेत एकही शिक्षक हजर नव्हता. विशेष म्हणजे, त्या शाळेत वीज ‘कनेक्शन’ नसल्याने शिक्षकाने शेजारच्या घरून एका वायरने वीजपुरवठा घेतला आहे. त्याला शाळेत ‘अर्थिंग’ दिले आहे.
अमन चंद्रशेखर धुर्वे (८, रा. जुनेवाणी, ता. रामटेक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जुनेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. ही शाळा रोज सकाळी १० वाजता सुरू होत असली तरी विद्यार्थी काही वेळेआधीच शाळेत यायला सुरुवात होते. त्या काळात ते शिक्षक येईपर्यंत आवारात खेळत असतात. अशाप्रकारेच अमन शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांसोबत शाळेच्या आवारात खेळ होता. खेळताना त्याचा स्पर्श भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ला झाला. त्यात वीजप्रवाह प्रवाहित असल्याने त्याला जोरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. स्थानिक तरुणाने आधी वीजपुरवठा खंडित करून त्याला बाजूला केले आणि पालकांसोबत लगेच देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
माहिती मिळताच सुरुवातीला ठाणेदार सुरेश मट्टामी, नंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी, खंडविकास अधिकारी रावसाहेब यावले, गटशिक्षणाधिकारी नितीन वाघमारे, गोंडवाणा गणतंत्र पक्षाचे वासुदेवशहा टेकाम यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच अमनच्या पालकाचे सांत्वन केले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
उघड्या ‘अर्थिंग’ने केला घात
या शाळेचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे खंडित केला होता. त्यामुळे शिक्षकांनी शेजारच्या घरून ‘सिंगल फेज’ वीजपुरवठा घेतला होता. तो घेताना शिक्षकांनी केवळ एका वायरचा वापर करून ‘अर्थिंग’ शाळेतच दिला. ती ‘अर्थिंग’ तार भिंतीच्या शेजारी लावली असून, तिला सुरक्षेच्यादृष्टीने छोट्या ‘पीव्हीसी पाईप’चे ‘कव्हर’ लावले नव्हते. त्या ‘अर्थिंग’ला ‘पीव्हीसी पाईप’ लावला असता किंवा घरून वीजपुरवठा घेताना ‘फेज’सोबतच दुसऱ्या वायरने ‘अर्थिंग’ घेतले असते तर कदाचित ही घटना टळू शकली असती. अमन हा त्याच्या आईवडिलांचा एकुलताएक मुलगा असून, त्याला दोन बहिणी आहेत. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्याचे आईवडील शेतीची कामे करून उदरनिर्वाह करतात. अमनच्या शरीरात आधीच रक्ताची कमतरता असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. शिवाय, त्याची देवलापार येथील शाळेत शिकण्याची इच्छा होती. मात्र, प्रकृती व आर्थिक परिस्थितीमुळे त्याला गावातील शाळेत शिकविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली.
पाच वर्ग; ३७ विद्यार्थी
या शाळेत इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षणाची सोय असून, एकूण पटसंख्या ३७ आहे. त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नीलकमल भोयर व सपना मानकर या दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. सहायक शिक्षिका मानकर यांच्याकडे मुख्याध्यापकपदाचा प्रभार आहे. दोघेही मुख्यालयी राहात नसून, ते रोज नागपूरहून ये - जा करतात. अमनला रुग्णालयात नेत असताना दोन्ही शिक्षक देवलापार - जुनेवाणी मार्गावर भेटल्याची माहिती नागरिकांनी दिली. वर्गखोल्यांच्या चाब्या शिक्षकांऐवजी गावातच असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुर्दैवी घटना
जुणेवाणी शाळेत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, ऐकताच जबर धक्का बसला. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यात सर्व कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे बयाण नोंदविले जाईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
नितीन वाघमारे,
गटशिक्षणाधिकारी, रामटेक.