नागपूर जिल्ह्यात विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:55 PM2018-07-17T22:55:17+5:302018-07-17T22:56:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रांसोबत शाळेच्या छतावर खेळत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा इमारतीजवळून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा (तांडा) येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. तक्रार करूनही तारा हटविण्यात न आल्याने ही घटना घडल्याचा आरोप करीत कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलिसांना मृतदेह उचलण्यास विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी नागरिकांची समजूत काढत शांत करण्याचा प्रयत्न केला.
आदित्य वासुदेव राठोड (११, रा. तांडा-दाभा, ता. हिंगणा) असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य हा दाभा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. या शाळेच्या इमारतीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या उघड्या आहेत. आदित्य शाळा सुटल्यानंतर त्याच्या दोन मित्रांसोबत या शाळेच्या छतावर खेळत होता. खेळताना त्याचा तोल गेला आणि जवळच असलेल्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्श झाला. विद्युत धक्क्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
त्यातच त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ गोळा झाले. सदर घटनेची माहिती लगेच हिंगणा पोलीस व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करताच नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनीने विजेच्या तारा न हटविल्याने ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांसह नागरिकांनी केला. शिवाय, आदित्यच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणीही रेटून धरल्याने घटनास्थळी तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रात्री उशिरापर्यंत पेच कायम होता.