व्हेंटिलेटरअभावी स्वाईन फ्लू रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:40 AM2017-09-06T01:40:42+5:302017-09-06T01:40:57+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. उपचारातही हलगर्जीपणा केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
हाजी इब्राहिम रा. शांतिनगर असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी इब्राहिमची प्रकृती खालावल्याने सुरुवातीला त्याला एका खासगी इस्पितळात भरती केले. तेथील डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची लक्षणे ओळखून या रोगावर सोयी नसल्याचे सांगितले आणि नंतर खूप खर्च येणार असल्याची माहिती दिली. यामुळे कुटुंबीयांनी हाजीला मेडिकलमध्ये भरती केले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू होते. रविवारी श्वास घेण्यास त्रास होत होता. नातेवाईकांनी व्हेंटिलेटर लावण्याची मागणी केली, परंतु डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष केले. रुग्णांनी मदतीसाठी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसैन, माजी आमदार दीनानाथ पडोळे व अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क साधला. परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता व्हेंटिलेटर उपलब्ध झाले, मात्र तासाभरात रुग्णाने शेवटचा श्वास घेतला. शेख हुसैन यांनी आरोप केला की, मुख्यमंत्र्यांच्या शहरात जर ही स्थिती असेल तर दुसºया शहरांचा विचारच करायला नको. स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढत असताना मेडिकलमध्ये पुरेशी उपकरणे नाहीत. औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जात नाही.