'अंनिस'चे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:39 PM2023-01-23T14:39:58+5:302023-01-23T14:45:49+5:30

फोनवर सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या, मुलालादेखील एसएमएस

Death threat to anti superstition activist shyam manav after giving challenge to Dhirendra Krishna Maharaj | 'अंनिस'चे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

'अंनिस'चे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

googlenewsNext

नागपूरअखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भातील तक्रारीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दिव्य दरबारवरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. बागेश्वर महाराज यांच्या दिव्यशक्तीला मानव यांनी आव्हान दिले होते. बागेश्वर महाराज यांनी नागपुरात येऊन दिव्यशक्ती सिद्ध करावी, असे आव्हान त्यांनी दिले होते. तसेच आम्ही दिलेल्या आव्हानामुळे महाराजांनी नागपुरातून गाशा गुंडाळला, असा दावा मानव यांनी केला होता. यानंतर मानव यांना सातत्याने धमक्या येऊ लागल्या. त्यांच्या मोबाईलवर काही दिवसांपासून जीवे मारण्याचे फोन येऊ लागले. याशिवाय त्यांच्या मुलाच्या मोबाईलवरदेखील धमक्यांचे एसएमएस आले.

तुमचा नरेंद्र दाभोळकर करून टाकू, रात्री ११ वाजेनंतर तुम्ही जिवंत राहणार नाही असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. अखेर मानव यांच्या समर्थकांनी पोलिसांत तक्रार दिली. नागपूर पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेतली व त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. अगोदर श्याम मानव यांच्यासोबत दोन सुरक्षारक्षक रहायचे. आता त्यांच्या व्यतिरिक्त चार बंदुकधारी पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहे.

भेटणाऱ्या प्रत्येकाची तपासणी

श्याम मानव सद्यस्थितीत रवीभवन येथील कुटिर क्रमांक १६ येथे थांबले असून तेथे सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची सखोल तपासणी होत असून त्यांचे नाव, कुठल्या कामानी भेट आहे याचीदेखील नोंद होत आहे.

धमकी येणे नवीन नाही : मानव

अशा प्रकारचे धमकीचे फोन व एसएमएस येणे हे काही नवीन नाही. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची स्थितीत चांगली आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत व त्यांनी निश्चित सुरक्षा यंत्रणांना सूचना दिल्या असतील. त्यामुळे मी या धमक्यांची काळजी करत नाही, असे मानव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शुक्रवारी नागपुरातील संविधान चौक येथे बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिंप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यात श्याम मानव यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा पुतळा ताब्यात घेतला. यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. केवळ हिंदू धर्मीयांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान असून, हिंदू धर्मीय हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला होता.

Web Title: Death threat to anti superstition activist shyam manav after giving challenge to Dhirendra Krishna Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.