दर तीन दिवसात होतोय एका वाघाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:56 AM2019-07-28T00:56:25+5:302019-07-28T00:59:47+5:30
निसर्गातील अन्न साखळीत वाघाचे खूप महत्त्व आहे. परंतु मानव वन्यजीव संघर्ष आणि वाघांच्या संवर्धनाच्या बाबतीत हवी ती काळजी घेण्यात येत नसल्यामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. वाघांच्या अधिवासावर आक्रमण होत असून यात वाघांचा बळी जात आहे. मागील सात महिन्यात भारतात ६३ वाघांचा मृत्यू झाला असून सरासरीनुसार तीन दिवसात एका वाघाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गातील अन्न साखळीत वाघाचे खूप महत्त्व आहे. परंतु मानव वन्यजीव संघर्ष आणि वाघांच्या संवर्धनाच्या बाबतीत हवी ती काळजी घेण्यात येत नसल्यामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. वाघांच्या अधिवासावर आक्रमण होत असून यात वाघांचा बळी जात आहे. मागील सात महिन्यात भारतात ६३ वाघांचा मृत्यू झाला असून सरासरीनुसार तीन दिवसात एका वाघाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वाघांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे वाघांचे मृत्यू होत आहेत. मागील वर्षाच्या आकडेवारीनूसार जगात ३ हजार ८९० वाघ आहेत. त्यापैकी २ हजार २२६ वाघ एकट्या भारतात म्हणजे ७० टक्के वाघ आपल्या देशात असल्याची माहिती अवी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जेरील बानाईत यांनी दिली. भारतात वाघांची संख्या अधिक असली तरी वाघांना धोका वाढत आहे. महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, तामिळनाडू या राज्यात वाघांचे प्रमाण वाढल्यामुळे आकडेवारी वाढलेली दिसते. मागील काही वर्षात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवर अधिक भर देऊन कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचे आहे. देशात ३० लाख नागरिक जंगलाशेजारी वास्तव्यास आहेत. तर जंगलाच्या आजूबाजूला ३ कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे. मागील ४० वर्षात जगात ५० टक्के जंगल घटले आहे. वन्यजीव मानव संघर्ष वन्यजीवांसाठी आरक्षित परिसरात होतो. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ५४.७९ टक्के वाघांचे हल्ले या परिसरात तर १३.७ टक्के मानवी वस्तीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळ्यात थंडी असल्यामुळे नागरिक इंधनासाठी लाकडे आणण्यासाठी जंगलात जातात. त्यामुळे ४२.५ टक्के हल्ले अशा वेळी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर ठोस उपाय करण्याची गरज आहे. जंगलाच्या आजूबाजूला उद्योगांना परवानगी नाकारून परिसरातील बंद पडलेल्या उद्योगांच्या जमिनी वन विभागाने ताब्यात घेण्याची गरज आहे. अन्न साखळीत वाघाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वाघ वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
शाळा-महाविद्यालयात करणार जनजागृती
नागपुरातील अवी फाऊंडेशन व्याघ्र संवर्धनाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नागपूर विभागात असलेल्या व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघ वाढल्यामुळे नागपूरची जागतिक स्तरावर टायगर कॅपिटल म्हणून ओळख निर्माण झाली आहे. नागपूरच्या चारही दिशांना ४० किलोमीटरच्या आत व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांचा अधिवास घनदाट जंगलात असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या जमिनीची धूप होत नाही. परिणामी पाण्याचे स्रोत टिकून राहतात. भूगर्भातील पाण्याची पातळी चांगली राहते. यातून जैवविविधतेचे संवर्धन होते. वाघांचे संवर्धन व्हावे, वाघांचे महत्त्व पटवून देण्यासाठी अवी फाऊंडेशन शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याची माहिती अवी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जेरील बानाईत यांनी दिली.