नागपूर क्षेत्रातील पवनीच्या जंगलात वाघ-वाघिणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:32 PM2017-11-17T22:32:38+5:302017-11-17T22:44:54+5:30
वनविभागाच्या पवनी वन परिसरांतर्गत असलेल्या पुसदा बीटमध्ये वयस्क वाघ व वाघिणीचे मृतदेह आढळले आहे. एकाचवेळी दोन वाघांचे मृतदेह मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : वनविभागाच्या पवनी वन परिसरांतर्गत असलेल्या पुसदा बीटमध्ये वयस्क वाघ व वाघिणीचे मृतदेह आढळले आहे. एकाचवेळी दोन वाघांचे मृतदेह मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
ही घटना नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या पवनी रेंज, पुसदा बीटमध्ये राऊंड टागलाच्या कम्पार्टमेंट क्रमांक ४५४ मध्ये घडली आहे. मृत वाघ-वाघिणीचे वय तीन ते साडेतीन वर्ष असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृत्यू हा दोन ते तीन दिवसापूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. घटनास्थळावर वाघाचे दात, नखे व अन्य अवयव शाबूत असल्याने, शिकार केल्याची शक्यता नाकारली जात आहे. मृतदेहाच्या थोड्या अंतरावर मृत गाईच्या डोक्याचा भाग आढळून आला आहे. वाघांनी गायीचे शरीर खाल्ल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी १ वाजता बीट वनरक्षक अरुण गीते हे गस्त घालत असताना, कम्पार्टमेंट ४५४ मध्ये त्यांना दोन वाघाचे शव आढळले. परंतु घटनास्थळ अतिशय आतमध्ये असल्याने मोबाईलचे नेटवर्क न मिळाल्यामुळे, गीते यांना वरिष्ठांना तात्काळ सूचना देणे शक्य झाले नाही. त्याने जंगलाबाहेरून स्थानिक अधिकाऱ्यासह नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यानाही सूचना दिली. सायंकाळी ५ वाजता दोन वाघांच्या मृत्यूची सूचना मिळताच उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, प्रफुल्ल भांबूरकर, एनटीसीएचे प्रतिनिधी डॉ. डी.एम. कडू, डॉ. चेतन, डॉ. मंडलिक आदी घटनास्थळी पोहचले.
अतिशय दुर्गम भागात घडली घटना
पवनी वनक्षेत्र हे नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत येते. हा भाग अतिशय घनदाट आणि उंचावर आहे. हे वनक्षेत्र देवलापार, भंडारा, बालाघाटच्या सीमेला लागून आहे. घटनास्थळापर्यंत पोहचण्यासाठी उंच वाहनाचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे वनअधिकाऱ्यांना त्यांची वाहने बदलवून घटनास्थळावर पोहचावे लागले.
शनिवारी शवविच्छेदन
प्रकरण वाघांच्या मृत्यूचे असल्यामुळे शवविच्छेदन एनटीसीए प्रतिनिधी व वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात येते. परंतु सूचना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्यास अंधार झाला होता. त्यामुळे शनिवारी सकाळी दोन्ही वाघांचे शवविच्छेदन करण्यात येईल. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.