नागपुरात ई-रिक्षाखाली दबून अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 09:29 PM2018-12-14T21:29:34+5:302018-12-14T21:30:35+5:30
रस्त्याच्या काठाने खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा ई-रिक्षाखाली दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्याच्या काठाने खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा ई-रिक्षाखाली दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पसरला आहे.
लव पप्पू बदरोटिया असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. लवचे वडील पप्पू बाजारात फिरून लहान-मोठ्या घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करतात. गुरुवारी दुपारी ३ वाजता पप्पूची पत्नी पिंकी घरासमोरील रस्त्याच्या काठावर बसली होती. जवळच लवही खेळत होता. त्याचवेळी ई-रिक्षाचालक रामराव हेडाऊ तेथून रिक्षा घेऊन गेला. असे सांगितले जाते की, हेडाऊ नशेत होता. त्याने निष्काळजीपणे उजव्या बाजूला पलटताना रिक्षा फिरवला. त्याचवेळी तो पलटला. रस्त्याच्या बाजूला खेळत असलेला लव त्याखाली दबला. चिमुकल्या लवचे डोके ई-रिक्षाच्या सळाखीखाली आले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. त्यांनी पाचपावली पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी हेडाऊला ताब्यात घेतले.
नागरिकांनी या अपघातासाठी परिसरातील लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. नागरिकांनी सांगितले की, २०१३ मध्ये नाईक तलाव मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे खांब रस्त्याच्या मध्ये आले. ते हटविण्यात आले नाही. घटनास्थळी सुद्धा रस्त्याच्या मध्ये विजेचा खांब आहे. या खांबामुळेच वाहनचालकांना त्रास होतो. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. वाहनांची गतीही अधिक असते. घटनास्थळाजवळच महात्मा ज्योतिबा हायस्कूल आहे. या शाळेतील मुलांना नेहमीच अपघाताचा धोका असतो.
नागरिकांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकाºयांची भेट घेऊन त्यांना येथे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली. तसेच रस्त्याच्या मध्ये आलेले खांब हटविण्याची मागणी केली. परंतु कुणीही ऐकले नाही. नागरिकांनी दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली. त्यांनी लवच्या वडिलांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली.
नशेत होता चालक
नाईक तलाव परिसर हा गरीब व मजूर वर्गांची वस्ती आहे. येथे अवैध दारूचे अनेक अड्डे आहेत. ते सर्रास चालतात. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही याची माहिती आहे. असे सांगितले जाते की, ई-रिक्षाचालक हेडाऊ हा सुद्धा अवैध दारूच्या अड्ड्यावरूनच परतत होता. नशेत असल्याने त्याने रिक्षावरील नियंत्रण सुटले.
यापूर्वीही झाले अपघात
याच ठिकाणी तीन दिवसापूर्वीच बाईकच्या धडकेत एक मुलगा थोडक्यात बजावला. दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी सन्नी राजू इरपाचे शाळेतून बाहेर येत होता. त्याचवेळी बाईकने त्याला धडक दिली. यात तो जखमी झाला. या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. त्यामुळे पालक व शिक्षकही दहशतीत आहेत.