नागपूर जिल्ह्यातील मनसर भागात टेम्पोखाली दबून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:02 AM2018-04-19T02:02:04+5:302018-04-19T02:02:14+5:30
टेम्पोच्या सावलीत जेवण करण्यास बसलेल्या मजुरांवर टेम्पो उलटला. त्यात दबून दोघांचा मृत्यू झाला. मृतात एका पुरुषाचा तर एका महिलेचा समावेश आहे. सोसाट्याच्या वादळामुळे टेम्पो उलटला हे विशेष! यात चार महिला सुदैवाने बचावल्या. ही दुर्घटना मनसरनजीकच्या सत्रापूर शिवारातील घटाटे मालगुजारी तलावालगत बुधवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मनसर : टेम्पोच्या सावलीत जेवण करण्यास बसलेल्या मजुरांवर टेम्पो उलटला. त्यात दबून दोघांचा मृत्यू झाला. मृतात एका पुरुषाचा तर एका महिलेचा समावेश आहे. सोसाट्याच्या वादळामुळे टेम्पो उलटला हे विशेष! यात चार महिला सुदैवाने बचावल्या. ही दुर्घटना मनसरनजीकच्या सत्रापूर शिवारातील घटाटे मालगुजारी तलावालगत बुधवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर तब्बल तीन तास उशिराने पारशिवनी पोलीस पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
टेम्पोचालक महेश शंकर जामखुरे (२६) आणि सुनीता पंचम ताकोद (३५) दोघेही रा. कांद्री वस्ती अशी मृतांची नावे आहेत. माहुली मार्गावरील रॅक पॉवर बायोगॅस प्लांटमध्ये वीज निर्मितीसाठी कचरा, तुराट्या, पºहाटी, बेशरम आदी टनाच्या हिशेबाने विकत घेतला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिक बेशरम तोडणीसाठी जातात. अशाप्रकारेच कांद्री येथील टेम्पोमालक शंकर काशीराम जामखुरे यांचा मुलगा महेश, त्याची आई माया शंकर जामखुरे (४५), लक्ष्मी श्रीहरी उके (३०), निर्मला मनोहर नान्हे (४०), सुनीता पंचम ताकोद आणि त्रिवेणी गजानन सोनटक्के (३९) सर्व रा. कांद्रीवस्ती हे कांद्रीपासून सहा किमी अंतरावरील घटाटे मालगुजारी तलावालगत सदाफुली तोडायला एमएच-३१/एम-६३५० क्रमांकाच्या ४०७ टेम्पोने आले. सदाफुली तोडल्यानंतर गठ्ठे बांधून टेम्पोलगत ठेवले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सर्वजण टेम्पोच्या सावलीत जेवण करायला बसले. त्याचवेळी सोसाट्याचे वादळ सुटले आणि टेम्पो उलटला. क्षणार्धात काही समजण्याआधीच त्याखाली महेश आणि सुनीता दबल्या गेले. इतर महिला बचावल्या.
टेम्पो उलटताच बचावलेल्या महिलांपैकी एक सत्रापूर गावाकडे धावत गेली. त्यानंतर काही वेळातच १५-१६ नागरिक धावून आले. तोपर्यंत बराच वेळ झालेला होता. नागरिकांनी टेम्पो बाजूला केला. मात्र त्याखाली दबलेल्या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. याबाबत पारशिवनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर तब्बल तीन तास उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. तपास ठाणेदार दीपक डेकाटे यांच्या मार्गदर्शनात संजय शिंदे, प्रमोद कोठे, अनिल मिश्रा, विजय बिसेन करीत आहे.
तो घास ठरला अखेरचा!
कांद्री परिसरातील अनेकांनी कचरा संकलनाला व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळीच हे मजूर कचरा संकलनासाठी बाहेर निघतात. अशाप्रकारचे पाच महिलांसह टेम्पोचालक सत्रापूर शिवारात आला. तेथे कचरा संकलन केल्यानंतर घराकडे निघण्यापूर्वी सर्वजण टेम्पोच्या आडोशाने सावलीत जेवणासाठी बसले. मात्र तेव्हाच वादळ सुटले आणि पोटात घास टाकताच टेम्पो उलटला. त्यात दबून एका महिलेसह टेम्पोचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.