दर आठव्या मिनिटाला गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:40 PM2020-02-01T22:40:10+5:302020-02-01T22:45:03+5:30
गेल्या वर्षी ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे की, भारतात २०२० पर्यंत कर्करोगाची १७.३ लाख नवे रुग्ण आढळून येतील तर या रोगामुळे मृत्यूची संख्या ८.८ लाखांवर पोहोचेल. या यादीत स्तन, फुफ्फुस आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे स्थान सर्वात वरचे असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षी ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे की, भारतात २०२० पर्यंत कर्करोगाची १७.३ लाख नवे रुग्ण आढळून येतील तर या रोगामुळे मृत्यूची संख्या ८.८ लाखांवर पोहोचेल. या यादीत स्तन, फुफ्फुस आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे स्थान सर्वात वरचे असेल. सध्याच्या स्थितीत देशात गर्भाशयमुखाच्या कर्करोगामुळे दर आठव्या मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो. स्तनाच्या कर्करोगाचे नव्याने निदान झालेल्या प्रत्येक दोन स्त्रियांपैकी एक स्त्री मृत्युमुखी पडते. तंबाखू-संबंधित आजारांमुळे दर दिवशी तब्बल २ हजार ५०० लोकांचा बळी जातो. २०१८ मध्ये तंबाखूमुळे सुमारे ३ लाख १७ हजार ९२८ पुरुष आणि महिलांचे मृत्यू झाले आहेत, अशी माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशिल मानधनिया यांनी दिली.
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. मानधनिया म्हणाले, जगात २०१८ मध्ये कर्करोगाचे सुमारे १.८१ कोटी नवीन रुग्ण आढळून आले तर ९६ लाख रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. पुरुषांच्या कर्करोगातील मृत्यूमध्ये प्रथम फुफ्फुसाचा नंतर, प्रोस्टेट, कोलोरेक्टल, यकृत व पोटाचा कॅन्सर आहे, तर स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे.
दरवर्षी ७ लाख ८४ हजार ८२१ मृत्यूची नोंद
भारतात सध्याच्या स्थितीत सुमारे २५ लाख रुग्ण कर्करोगाशी लढा देत आहेत. दरवर्षी ११ लाख ५७ हजार २९४ नव्या कर्करुग्णांची भर पडते, तर ७ लाख ८४ हजार ८२१ मृत्यूची नोंद होते. यात पुरुषांची संख्या ४ लाख १३ हजार ५१९ आहे आणि स्त्रियांची संख्या ३ लाख ७१ हजार ३०२ आहे. मृत्यूमध्ये पुरुषांत तोंडाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग तर स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाचा आणि स्तनाचा कर्करोग कारणीभूत ठरत आहे. स्त्रियांमधील कर्करोगाच्या एकूण टक्केवारीतील २७ टक्के वाटा एकट्या स्तनाच्या कर्करोगाचा आहे. या कर्करोगामुळे ७० हजार २१८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात पुरुषांमध्ये तोंडाचा तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वाधिक
२०१६च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये कर्करोगाची १३२७२६ प्रकरणे, तर मृत्यूची संख्या ६०७३५ एवढी होती. पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे कर्करोग म्हणजे तोंडाचा कर्करोग आहे. त्यानंतर फुफ्फुस, पोट, मोठे आतडे व मलाशय आणि अन्ननलिकेचा कर्करोग आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वाधिक आढळून येतो. त्यानंतर तोंडाचा, गर्भाशयाचा मुखाचा, फुफ्फुसांचा आणि पोटाचा कर्करोग आढळून येतो.