नागपुरातील ज्येष्ठ संपादक वामन तेलंग यांचे देहावसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:17 AM2020-06-11T10:17:59+5:302020-06-11T10:19:54+5:30
दै. तरूणभारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दै. तरूणभारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक निधन झाले. रात्री दहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत होते म्हणून इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
तरूण भारताच्या रविवारच्या पुरवणीच्या त्यांनी केलेल्या संपादनाच्या निमित्ताने विदर्भातील आजच्या कितीतरी आघाडीच्या लेखकांना त्यांनी त्यावेळी लिहिते केले. गुणग्राहकता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच भाग असल्याने अनेक गुणी लेखक त्यांनी शोधून शोधून उभे केले.
तरूण भारताला ग.त्र्यं.माडखोलकरांनी दिलेली वाङ्म्यीन प्रतिष्ठा आणि अभिरूची यांचे जोपासन व संवर्धन करणाऱ्या या परंपरेला व त्या निमित्ताने विदर्भातीलही पत्रपरंपरेला ज्यांनी समृद्धी बहाल केली त्यात वामन तेलंग ही होते.
वामनप्रभू या संयुक्त नावाने प्रभाकर सिरास यांच्या सोबत केले गेलेले त्यांचे कथालेखन विदर्भातील ज्येष्ठांच्या अजूनही स्मरणात आहे.
त्यांचे स्वत:चे लेखन,परीक्षण, इ. हे तिरकस शैलीने पण संबंधित व्यक्ती , कृती , प्रसंग इ.चे कोणतीही भीडमुर्वत न बाळगता केलेले परखड
परीक्षण असायचे. लेखनातील त्यांची ती शैली त्यांच्या व्यक्तिमत्वाचीही निदर्शक होती. कोणाला काय वाटेल हा त्यांच्या लिहिण्या- बोलण्याचा निकष कधीच नव्हता. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
नवोदितांना लिहितं करणारा संपादक
एक अत्यंत प्रसन्न आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि नवोदित लेखक लेखिकांना प्रोत्साहन देऊन नावारुपाला आणणारा वामनरावांसारखा दुसरा संपादक झाला नाही. विदर्भात आज ज्यांची नावे मोठी आहेत ते सगळे साहित्यिक वामनरावांनी त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत प्रत्यक्ष मार्गदर्शन करून घडवले आहेत. त्यांनी कुणालाही नाउमेद केले नाही आणि प्रत्येकाची प्रतिभा फुलती राहील असेच संबंध त्यांच्याशी राखले. ललित लेखन जे माझ्या हातून घडलं त्याला कारणसुद्धा वामन तेलंग हेच आहेत.
सुरेश द्वादशीवार, माजी संपादक, लोकमत नागपूर