धावत्या रेल्वेत चढताना मृत्यू, कुटुंबाला ८ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:52 AM2024-02-05T06:52:14+5:302024-02-05T06:52:41+5:30
संबंधित रेल्वेचा बुटीबोरीमध्ये पाच मिनिटांचा थांबा होता, पण मार्ग मोकळा नसल्यामुळे ती रेल्वे एक तास खोळंबली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या रेल्वेमध्ये चढताना खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे पीडित पत्नी, मुलगी व दोन मुलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली व ही रक्कम चार महिन्यांत अदा करण्याचे निर्देश मध्य रेल्वेला दिले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. गौतम पाटील असे मृताचे नाव असून ते वर्धा जिल्ह्यातील रहिवासी होते.
संबंधित रेल्वेचा बुटीबोरीमध्ये पाच मिनिटांचा थांबा होता, पण मार्ग मोकळा नसल्यामुळे ती रेल्वे एक तास खोळंबली. प्रशासनाने रेल्वे विलंबाचे कारण व रेल्वे कधी सुटेल याची माहिती प्रवाशांना दिली नाही. रेल्वे अचानक सुरू झाल्याने पाटील यांची ताळांबळ उडाली. त्यामुळे अपघाताकरिता रेल्वेही जबाबदार आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले.
काय घडले होते?
nपाटील हे कुटुंबीयांसह तुळजापूरला गेले होते. ते १० जून २०११ रोजी परतीच्या प्रवासाकरिता भुसावळ-नागपूर पॅसेंजरमध्ये बसले होते.
nरेल्वे बुटीबोरीला थांबल्यानंतर ते खाद्यपदार्थ घेण्यासाठी खाली उतरले होते. रेल्वे अचानक सुरू झाली. ते रेल्वेत चढताना खाली पडून मरण पावले.
आधी दावा नामंजूर
पाटील यांच्या कुटुंबीयांकडून भरपाई मिळावी या मागणीसाठी रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल करण्यात आला होता.
मात्र, रेल्वेमध्ये चढताना झालेल्या अपघाताकरिता पाटील स्वत: कारणीभूत असल्याचे कारण देत दावा नामंजूर केला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.